लांजा : मुंबई विद्यापीठ आयोजित ५८ व्या युवा महोत्सवात श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून महाविद्यालयाचा लौकिक वाढवला.
कला शाखेच्या द्वितीय वर्षातील सोहम प्रकाश मांडवकर याने स्पॉट फोटोग्राफी स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावत कांस्यपदक मिळवले. या यशासाठी विद्यार्थी स्वप्निल कुंभार याचे मार्गदर्शन लाभले. ग्रामीण पार्श्वभूमीतील विद्यार्थ्याने फोटोग्राफीसारख्या तांत्रिक क्षेत्रात मिळवलेली ही कामगिरी विशेष ठरली.
कला शाखेच्या तृतीय वर्षातील आझमीना अल्लाउद्दीन नेवरेकर हिने मेहंदी डिझायनिंग स्पर्धेत कोकण झोनमध्ये प्रथम क्रमांक मिळवत विद्यापीठस्तरीय व्यासपीठावर उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. तिच्यासोबत नदिरा अमजद वणू ही सहाय्यक म्हणून सहभागी होती. तसेच अकाउंट अँड फायनान्स शाखेची तन्वी ज्ञानेश्वर आगरे हिने रांगोळी विद्यापीठस्तरीय स्पर्धेत महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले.
मुंबई विद्यापीठ, फोर्ट येथील सर चावूसजी जहांगीर कॉन्व्होकेशन हॉल येथे पार पडलेल्या या महोत्सवात पारंपरिक आणि आधुनिक कलांचे दर्शन घडले. या माध्यमातून लांजा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची कला विद्यापीठस्तरावर पोहोचली.
या यशाबद्दल न्यू एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष जयवंत शेट्ये, उपकार्याध्यक्ष सुनील कुरूप, सचिव महेश सप्रे, सहसचिव राजेश शेट्ये, संचालक व सल्लागार मंडळ, प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. सुनिल चव्हाण, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. सचिन घोबले तसेच प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
लांजा : मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात आझमीना नेवरेकर मेहंदी डिझायनिंग स्पर्धेत कोकणात प्रथम
