दिल्ली: बिहार दौर्यावर गेलेले काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या सुरक्षेत मोठी चूक समोर आली आहे. पूर्णिया येथे बाईक रॅली दरम्यान एका तरुणाने राहुल गांधींना चुंबन दिले.
त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्या तरुणाला बाजूला खेचले आणि चापटही मारली. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ही घटना रविवार(दि.२४) रोजी पूर्णिया येथे वोटर अधिकार यात्रा दरम्यान घडली. राहुल गांधी बुलेटवर बसलेले होते आणि त्यांच्या मागे बिहार काँग्रेसचे अध्यक्ष राजेश राम बसले होते. यात्रेच्या दरम्यान एक व्यक्ती त्यांच्या बाइकजवळ आला आणि त्यांना चुंबन देऊ लागला. त्याक्षणी सुरक्षा कर्मचाऱ्याने तत्काळ त्या व्यक्तीला पकडलं आणि त्याला एक चापट लगावली. मिळालेल्या माहितीनुसार, त्या तरुणाला आता ताब्यात घेतले आहे.
खरं तर राहुल गांधी हे बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्या संयुक्त नेतृत्वात सुरू असलेल्या वोटर अधिकार यात्रेचा भाग आहेत. या यात्रेत राहुल गांधींचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळतो आहे. पूर्णिया येथे आपल्या नेत्याला बाइक चालवताना पाहून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला होता.
राहुल गाांधींची यात्रा रविवारी(दि.२४) अररियाला पोहोचली. येथून राहुल गांधी संध्याकाळी दिल्लीला रवाना होतील. मंगळवारी प्रियंका गांधी वाड्रा या यात्रेत सामील होणार आहेत. राहुल गांधींच्या या यात्रेचा आज आठवा दिवस आहे. त्यांच्यासोबत तेजस्वी यादव, मुकेश साहनी, सीपीआय (एमएल) नेते दीपांकर भट्टाचार्य आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे देखील आहेत.
बाईक रॅली दरम्यान राहुल गांधींना तरुणाने दिले चुंबन; सुरक्षा रक्षकाने मारली चापट
