रत्नागिरी: शहरातील रत्नदुर्ग किल्ल्याजवळील सनसेट पॉईंटवरून 29 जून रोजी आत्महत्या केलेल्या नाशिक येथील तरुणीचा, सुखप्रित धालीवाल हिचा अद्यापही शोध लागलेला नाही. घटनेला दहा दिवसांहून अधिक काळ उलटला असून, समुद्राला आलेल्या उधाणामुळे शोधकार्य थांबले असल्याने पोलिसांना तपासात अनेक अडचणी येत आहेत.
नाशिक येथे बँकेत नोकरीला असणारी सुखप्रित धालीवाल (नाव बदलले आहे) आपल्या मित्राला भेटण्यासाठी 29 जून रोजी रत्नागिरीत आली होती. त्याच दिवशी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास तिने सनसेट पॉईंटवर आपले चप्पल आणि स्कार्फ बाजूला ठेवून रेलिंगच्या पुढे गेली आणि कठड्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची पोलिसांत नोंद आहे. या घटनेची माहिती मिळताच सुखप्रितचे नातेवाईक रत्नागिरीत दाखल झाले.
या प्रकरणी सुखप्रितच्या वडिलांनी तिच्या मित्रावर गंभीर आरोप करत, “माझ्या मुलीला फसविल्याचा” ठपका ठेवला आहे. त्यांनी रत्नागिरी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, पोलिसांनी सुखप्रितच्या मित्राविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
मित्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी सुखप्रित अद्याप सापडून न आल्याने तपास कामात अडथळा निर्माण होत आहे. सुखप्रित नाशिक येथे असताना तिने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती, ज्यात तिने आपली व्यथा मांडली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
गेल्या 10 दिवसांत पोलिसांनी सुखप्रितचा शोध घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पोलीस जवान, माऊंटेनियर्सची टीम, आणि एनडीआरएफच्या जवानांनी अथक प्रयत्न केले. सर्व संसाधने वापरूनही या तरुणीचा शोध लागलेला नाही. सध्या पावसाळा असल्याने समुद्राला मोठे उधाण आले आहे, ज्यामुळे शोधकार्यात अडथळा निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे. पोलीस अजूनही समुद्रकिनारी भागात लक्ष ठेवून आहेत, मात्र सुखप्रितबद्दल कोणतीही ठोस माहिती पोलिसांना मिळू शकलेली नाही.