रत्नागिरी: केंद्र सरकारच्या नियमानुसार १२ सागरी मैल पलीकडील खोल समुद्रात उद्यापासून म्हणजेच १ ऑगस्टपासून मासेमारी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, १२ सागरी मैलांच्या बाहेर मासेमारी करण्यासाठी केंद्र सरकारचा परवाना असणे आवश्यक असून, रत्नागिरी जिल्ह्यात फक्त ३०५ मच्छिमारांकडेच हा परवाना आहे. महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात म्हणजेच १२ सागरी मैलांच्या आत मासेमारी करण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, केंद्र सरकारची १ जून ते ३१ जुलै दरम्यान असलेली मासेमारी बंदी आज संपल्यामुळे उद्यापासून १२ सागरी मैलांच्या बाहेर खोल समुद्रात मासेमारी सुरू होणार आहे.
केंद्र सरकारच्या जलधी क्षेत्रात मासेमारी करण्यासाठी केंद्र सरकारचा परवाना असणे बंधनकारक असल्याने जिल्ह्यात केंद्र सरकारचा परवाना असलेल्या ३०५ नौकांवर सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांची करडी नजर राहणार आहे. उद्यापासून १२ सागरी मैलांच्या बाहेर होणाऱ्या मासेमारीवर लक्ष ठेवण्यासाठी सागरसुरक्षा रक्षकांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. मासेमारी करून येणाऱ्या प्रत्येक नौकेचा परवाना बंदरात कसून तपासण्यात येणार आहे.





