खेड: खेड शहरातील डाकबंगला परिसरात मंगळवारी सकाळच्या सुमारास कोंबड्या वाहून नेणारी व्हॅन रस्त्यालगत उलटून अपघातग्रस्त झाली. सुदैवाने या अपघातात चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही, मात्र व्हॅनचे मोठे नुकसान झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, सकाळी साडेआठच्या सुमारास खेडहून बाहेरगावी कोंबड्या घेऊन जाणारी एक मालवाहू व्हॅन डाकबंगला परिसरातील अरुंद व रस्त्याच्या कडेला सुरू असलेल्या नळपाणी योजनेच्या कामामुळे असलेल्या खोदकामाजवळ उलटली. खोदकामामुळे रस्ता अरुंद झालेला असल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
अपघातानंतर काही काळ वाहतूक अडथळलेली होती. स्थानिक नागरिक आणि वाहतूक पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेऊन शर्थीचे प्रयत्न करून व्हॅन बाजूला हटवली. यासाठी जेसीबीच्या सहाय्याने उलटलेली व्हॅन रस्त्याच्या बाजूला नेण्यात आली.
अपघातामुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण होते. व्हॅनमधील काही कोंबड्या जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे.
खेडमध्ये कोंबड्याची वाहतूक करणारी व्हॅन उलटली
