देवरुख: देवरुख आगारातून पुणे मार्गावर सुटणाऱ्या एसटी बसेसच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त होत आहे. लांब पल्ल्याच्या या मार्गावर जुन्या, धोकादायक आणि असुविधाजनक बसेस सोडल्या जात असल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून यावर उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
देवरुख आगारातून सकाळी ८ वाजता पुण्याला जाणारी बस सुटते. काही काळापूर्वी पाटण-कोयना राष्ट्रीय महामार्गावरील पूल वाहून गेल्याने हा मार्ग बंद होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरत्या अटींवर मार्ग खुला केल्यानंतर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ३० जून २०२५ रोजी उत्तम स्थितीत असलेल्या बसेस वापरण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र, देवरुख आगाराने या सूचनांना पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप प्रवासी करत आहेत.
लांजा आणि संगमेश्वर मार्गांवर चांगल्या स्थितीत असलेल्या बसेस धावत असताना, देवरुख-पुणे मार्गावरील प्रवाशांना मात्र जुनाट, धोकादायक आणि गैरसोयीच्या बसेसचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, शनिवारी तर पंढरपूर यात्रेचे कारण देत चक्क लोकल फेऱ्यांसाठी वापरली जाणारी गाडी देवरुख-पुणे मार्गावर पाठवण्यात आली. नागरिकांनी मागणी करून आणि आंदोलने करून देवरुख आगाराला १० नवीन बसेस मिळवून दिल्या असतानाही, प्रशासन याच जनतेला दुय्यम वागणूक देत असल्याचा सूर उमटत आहे. “प्रशासन जनहितासाठी आहे की केवळ राजकीय दबाव आल्यावरच काम करते? मग प्रत्येकवेळी आमदार किंवा पालकमंत्र्यांकडेच दाद मागावी का?” असा संतप्त सवाल प्रवाशांनी विचारला आहे.
प्रवाशांनी मागणी केली आहे की, देवरुख-पुणे मार्गावर तात्काळ उत्तम स्थितीत असलेल्या बीएस-६ (BS-6) दर्जाच्या बसेस सुरू कराव्यात. मागील काही महिन्यांतील या मार्गावरील बसेसची सखोल तपासणी करावी आणि स्पष्ट सूचनांनंतरही दुर्लक्ष करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. जनतेची फसवणूक थांबवावी अशी त्यांची मागणी आहे. आगार व्यवस्थापन सूडबुद्धीने कारभार करत असल्याचा संशयही काही प्रवाशांनी व्यक्त केला आहे. प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, असा इशाराही त्यांनी देवरुख आगाराला दिला आहे.
या संदर्भात वाहतूक नियंत्रक प्रकाश सावंत यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी शनिवारी देवरुख-पुणे मार्गावर सोडलेली बस चांगल्या कंडीशनमध्ये असल्याचा दावा केला. नवीन बसेस अक्कलकोट, पंढरपूर यांसारख्या मार्गांवर सोडण्यात आल्या असून, आगाराला नवीन बसेस मिळाल्यास त्या देवरुख-पुणे मार्गावर सोडल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, प्रवाशांचा वाढता रोष पाहता, यावर तातडीने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.