गणपती सजावटीसाठी प्लास्टिक फुले वापरल्यास २५ हजारांचा दंड

Gramin Varta
266 Views

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी शहरातील बाजारपेठांमध्ये सजावटीचे साहित्य मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहे. गणरायाच्या स्वागतासाठी घराघरांत तसेच सार्वजनिक मंडळांकडून तयारी सुरू असताना प्लास्टिकच्या कृत्रिम फुलांसह प्लास्टिक झाळर, थर्माकोल आणि अन्य प्रतिबंधित साहित्याचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर २५ हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई होऊ शकते.

गणेशोत्सवाच्या काळात घरगुती सजावट, गणेश मंडप आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी विविध प्रकारच्या सजावटीच्या वस्तूंना मोठी मागणी असते. बाजारात आकर्षक रंग, आकार आणि कमी किमतीतील प्लास्टिकच्या वस्तू उपलब्ध झाल्या आहेत. मात्र, पर्यावरणाच्या दृष्टीने घातक ठरणाऱ्या या वस्तूंचा वापर करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

बंदी असतानाही काही ठिकाणी प्लास्टिकचे सजावटीचे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे दिसून येते. त्यामुळे विक्रेते तसेच ग्राहकांनी नियमांचे पालन करण्याची गरज आहे. प्रतिबंधित प्लास्टिक किंवा थर्माकोलच्या वस्तूंचा वापर करून सजावट करणाऱ्या गणेश मंडळांवर, सार्वजनिक कार्यक्रमांच्या आयोजकांवर तसेच संबंधित डेकोरेटर्सवरही कारवाई होऊ शकते.

प्लास्टिकच्या सजावटीच्या वस्तूंमध्ये विविध रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो. वापरानंतर या वस्तू सहज विघटित होत नसल्याने कचऱ्याचे प्रमाण वाढते आणि पर्यावरणावर त्याचा विपरीत परिणाम होतो. कृत्रिम प्लास्टिक फुलांचा वापर वाढल्यास नैसर्गिक फुलांची मागणी घटून फूल उत्पादक शेतकऱ्यांनाही आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेशोत्सवाची सजावट करताना नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Total Visitors :
4819978
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *