ॲड. जमीर खलिफे यांचा शहरप्रमुखांना रोखठोक सवाल
राजापूर : डांबर-डांबर खेळ खेळत, विकासाची जाहिरात फलकांवर झळकतेय आणि जमिनीवर मात्र खड्डेच खड्डे… राजापूर शहरात सध्या ‘विकास’ नावाच्या शब्दाचा जितका वापर होतोय, तितका विकास मात्र कुठेच दिसत नाही. नगरपरिषदेच्या निवडणुका तोंडावर आल्यावरच शहरप्रमुखांना पावसाळ्यात विकास आठवतो, यावर राजापूरचे माजी नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
“डांबरावर काँक्रीट, काँक्रीटवर पेव्हर ब्लॉक, पुन्हा डांबर… हाच का विकास? की खड्ड्यांत लपवलेला भ्रष्टाचार?” असा सवाल खलिफे यांनी थेट विचारला आहे.
दोन वर्षांपूर्वी कोट्यवधींच्या खर्चाने बनवलेला जवाहर चौक ते जकातनाका रस्ता आज खड्ड्यांनी गिळला आहे. वाहनधारक आणि नागरिक रोज त्रस्त होतात. हे खड्डे गेल्या दोन वर्षांपासून आहेत, पण शहरप्रमुखांच्या लक्षात ते आत्ता, म्हणजेच निवडणुका जवळ आल्यावरच आले!
खड्ड्यांवर तात्पुरते पेव्हर ब्लॉक टाकून “पावसाळ्यानंतर काँक्रीटीकरण करू” असे सांगणाऱ्या शहरप्रमुखांनी स्वतःच्या प्रभागातील एकच रस्ता चार महिने पूर्ण केला नाही, याकडेही खलिफे यांनी लक्ष वेधलं.
सध्या शहरात रस्ते दुरुस्तीसाठी जे काही चाललंय ते खरे ‘विकास काम’ नसून, निवडणुकीपूर्वीचा ‘डॅमेज कंट्रोल’ आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
“महापुरुष घुमटी, मापारी मोहल्ला, बलबले मशिद, कोंढेतड ब्रीज ते मशिद रस्ता हे सगळे रस्ते अचानक लक्षात कसे आले?”
हा निव्वळ राजकारणाचा खेळ आहे, शहरवासीयांच्या सहनशीलतेचा गैरफायदा आहे, असं खलिफे ठामपणे म्हणाले.
“शहरात विकास नव्हे, ठेकेदारी फोफावत आहे”, कार्यकर्तेच ठेकेदार बनून निकृष्ट दर्जाची कामं करतायत. काही कामं अर्धवट आहेत, तर जी पूर्ण झालीत त्यांचा दर्जा पहिल्याच पावसात उघड झाला आहे. पण यावर युवा नेत्यांचं मौन लक्षणीय आहे, असा टोला त्यांनी लगावला.
“राजापूर शहरात विकासाच्या नावाखाली जो खेळ सुरू आहे, त्याचा फैसला आता जनता करणार आहे. यावेळी नागरीकांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा आणि फसव्या विकासवादाला धडा शिकवावा,” असं ठाम आवाहन खलिफे यांनी शेवटी केलं आहे.