GRAMIN SEARCH BANNER

दापोली: असोंड-कुंभारवाडी रस्ता खचला; संपर्क तुटला

Gramin Varta
9 Views

दापोली : तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे असोंड गावातून कुंभारवाडीकडे जाणारा महत्त्वाचा रस्ता आणि मोरी वाहून गेल्याने कुंभारवाडी आणि गणेशवाडी वस्त्यांचा गावाशी संपर्क तुटला आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे रस्त्याशेजारील ओढा दुथडी भरून वाहत होता, ज्यामुळे पाण्याचा वेग वाढून मोरीसह रस्त्याचा काही भाग खचला.

या घटनेमुळे या वाड्यांमधील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या रस्त्यावरूनच नळपाणी योजनेचे पाईप जात असल्यामुळे पाणीपुरवठाही विस्कळीत झाला आहे. तसेच, रस्त्यालगत असलेली पिण्याच्या पाण्याची विहीर आता नागरिकांसाठी दुर्गम बनली आहे.

हा रस्ता दापोलीच्या मुख्य रस्त्याला जोडणारा असून त्यावर नेहमीच वर्दळ असते. दोन वर्षांपूर्वीच या रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. मात्र, त्याच वेळी ग्रामपंचायतीने मोरीच्या जागी पुलाची मागणी केली होती. मार्च २०२३ पूर्वी जिल्हा परिषदेलाही यासंदर्भात लेखी पत्र देण्यात आले होते, परंतु त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे ही आपत्ती ओढवली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य तसेच ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. गावाच्या मुख्य रस्त्यावर दरड कोसळून आलेली माती जेसीबीच्या साहाय्याने बाजूला करून रस्ता मोकळा करण्याचे प्रयत्नही ग्रामस्थांनी केले.
दरम्यान, उनवरे-वावघर रस्त्यावर भरतीप्रमाणे पाणी भरल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला आहे. या भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Total Visitor Counter

2649063
Share This Article