रस्त्यावर रक्तबंबाळ बैल अन् मदतीसाठी धावले रत्नागिरीकर; प्रशासन मात्र कुठे?

Gramin Varta
202 Views

रत्नागिरी / अजय सावंत : मिऱ्या-नागपूर महामार्गावर चारचाकी वाहनाच्या जोरदार धडकेत बैल गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. मात्र जखमी बैलाला रस्त्यावर असहाय अवस्थेत सोडून न जाता रत्नागिरीकरांनी मदतीसाठी धाव घेतली.

विशेष म्हणजे, मदतीसाठी प्रशासनाकडे संपर्क करूनही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप मदतकर्त्यांनी केला आहे. अखेर नागरिकांच्या पुढाकारातून जखमी बैलाला उपचारासाठी गोशाळेत दाखल करण्यात आले.

मिऱ्या-नागपूर महामार्गावरील जेके फाइल्सनजीक बुधवारी (२ सप्टेंबर) रात्री पावणेआठच्या सुमारास चारचाकी वाहनाने बैलाला जोरदार धडक दिली. या अपघातात बैल गंभीर जखमी झाला आणि त्याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. धडकेनंतर वाहनचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, जखमी बैलाला पाहून स्थानिक नागरिक, नाचणे ग्रामपंचायतीचे कर्मचारी तसेच रस्त्यावरून जाणारे अनेक नागरिक मदतीसाठी थांबले. तरुणाईने पुढाकार घेत बैलाला औषधोपचार करण्यास सुरुवात केली. वाहतूक सुरळीत राहावी आणि आणखी अपघात होऊ नये, यासाठी उपस्थितांनी बैलाच्या बाजूला बॅरिकेड्सही लावले.

112 वर कॉल; मदतीला दीड तास?

मदतकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, याच मार्गावरून तीन ते चार पोलीस कर्मचारी पुढे गेले; मात्र त्यांनी घटनास्थळाकडे दुर्लक्ष केले. त्यापैकी एका कर्मचाऱ्याने थांबून 112 क्रमांकावर मदतीसाठी फोन केला. त्यानंतर 112 ची गाडी तब्बल एक ते दीड तासाने घटनास्थळी पोहोचल्याचे मदतकर्त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांकडून बैलावर उपचार करणाऱ्या मदतकर्त्यांवरच दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप संबंधितांनी केला आहे.

डॉक्टर आणि उद्योजकाने दाखवली माणुसकी

या दरम्यान पाली येथील डॉक्टर राज सावंत हे त्याच मार्गाने जात असताना जखमी बैलाला पाहून स्वतःहून थांबले. त्यांनी बैलाला प्रथमोपचार म्हणून तातडीने इंजेक्शन दिले. त्यांच्या या कृतीतून डॉक्टरकीसोबतच माणुसकीचेही दर्शन घडले.

यानंतर रत्नागिरीतील युवा उद्योजक आनंद चौगुले घटनास्थळी पोहोचले. त्यांनी स्वतःचा जेसीबी आणून जखमी बैलाला टेम्पोमध्ये ठेवण्याची व्यवस्था केली. त्यानंतर बैलाला चंपक मैदान येथील गोशाळेत उपचारासाठी रवाना करण्यात आले. गोशाळेत पोहोचल्यानंतर त्याला चारा देण्यात आला असून पुढील उपचार व आवश्यक कार्यवाही करण्यात आली.

जबाबदारी कोणाची? नागरिकांचा संतप्त सवाल

जखमी बैलाच्या उपचारासाठी मदत करणाऱ्या व्यक्तींनी नगर परिषद अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, ही घटना नाचणे ग्रामपंचायत हद्दीत येत असल्याचे सांगून नगर परिषद अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकली, असा आरोप उपस्थितांनी केला. त्यानंतर नाचणे ग्रामपंचायतच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशीही संपर्क होऊ शकला नाही, असे मदतकर्त्यांनी सांगितले.

या संपूर्ण घटनेत प्रशासनाकडून अपेक्षित मदत मिळाली नसल्याचा आरोप मदतकर्त्यांनी केला. अखेर प्रशासकीय यंत्रणेची मदत मिळण्याची प्रतीक्षा न करता रत्नागिरीकरांनीच पुढाकार घेतला आणि जखमी बैलाला उपचारासाठी गोशाळेत दाखल केले. त्यामुळे मुक्या जीवासाठी नागरिकांनी दाखवलेल्या या माणुसकीचे कौतुक होत असतानाच, अशा घटनांमध्ये प्रशासनाची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवालही उपस्थित होत आहे.

Total Visitors :
4808064
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *