मुंबई: राज्याचे कृषीमंत्री ॲड. माणिकराव काेकाटे विधीमंडळ सभागृहात ऑनलाईन रमी खेळतानाची चित्रफित प्रसिध्द झाल्यानंतर त्यांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात या खेळाचे लोण मोठया प्रमाणात पसरले आहेत.
त्यातून काही तरुणांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले आहे.
देशात सात प्रकारचे ऑनलाईन खेळ खेळले जातात. यात पैसे लावून खेळले जाणारे खेळ रमी, पोखर, ड्रीम ११ आणि एमपीएल असे खेळाचे चार प्रकार आहेत. एका अहवालानुसार ऑनलाईन रमी खेळणाऱ्यांची संख्या देशात काही कोटींमध्ये आहे. इंटरनेट वापरणाऱ्यापैकी विविध प्रकारचे खेळ खेळण्यात मश्गुल असतात. ग्रामीण भागातील तरुणांचा यात मोठा भरणा आहे. ऑनलाईन रमीची जाहिरात करणाऱ्यांमध्ये अनेक चित्रपट तारकासह जगप्रसिध्द क्रिकेटपट्टू सचिन तेडुंलकर याचा सहभाग असल्याने बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत तेंडुलकर यांच्या घराजवळ ३१ ऑगस्ट २०२३ रोजी आंदोलन करण्यात आले होते. ऑनलाईन जुगारावर आंध्र प्रदेश, आसाम, नागालॅण्ड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, ओडीसा, तेलंगणा या आठ छोटया राज्यात बंदी आहे.
ऑनलाईन रमी खेळाच्या आहारी गेलेल्या तरुणांची संख्या मोठी आहे. या खेळात पहिल्यांदा बोनस दिला जातो. त्यामुळे त्यातील गोडी वाढते. या खेळाच्या आधीन गेल्यानंतर अनेक तरुणांनी कर्ज काढून खेळ कायम ठेवला आहे. पुण्यातील औंंध भागातील २९ वर्षीय तरुणाने घरातील ३८ लाखाचे दागदागिने, रोकड घरातून पळविली. यात क्षेत्रातील पुस्तक विक्रेता ६९ लाख रुपये जिंकला पण त्याला ४५ लाख रुपये कंपनीने दिले नाहीत. त्याने सायबर सेलकडे फसवणूकीचा गुन्हा नोंदविला आहे. मावळ तालुक्यातील कुसगाव ग्रामपंचायत एक श्रीमंत ग्रामपंचायत ओळखली जाते. तेथील दोन तरुण या खेळात कर्जबाजारी झाले आहेत तर दुधिवरे गावातील दोन तरुणांनी या खेळापायी शेती विकली. कामशेत गावातील एका तरुणाने आत्महत्या केली. धारशिव मधील बावी गावच्या लक्ष्मण मारुती जाधव या तरुणाने या खेळासाठी पत्नी व दोन वर्षाच्या बाळाला विष पाजून मागील महिन्यात १६ जून रोजी जीवन संपविले. सायबर गुन्ह्यात या खेळात फसवलेले, कर्जबाजारी, आत्महत्याग्रस्तांचा समावेश येतो.
‘प्रहार’ संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडून यांनी जुलै २०२३ मध्ये या खेळात तरुणाई कशी गुरफुटत चालली आहे ते विधानसभेत मांडले. जनसुरक्षा सारखे कायदे तत्परतेने आणणाऱ्या सरकारने दोन वर्षानंतरही याबाबत कोणतेही पाऊल उचललेले नाही, अशी टीका कडू यांनी केली.
राज्यातील तरुणाई ऑनलाईन रमी खेळात कर्जबाजारी, आत्महत्याही वाढल्या
