माजी आमदार सौ. हुस्नबानू खलिफे व माजी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांच्या प्रयत्नांना यश
राजापूर : शहराच्या मध्यभागी असलेला ऐतिहासिक नन्हेसाहेब पूल लवकरच नव्या रूपात झळकणार आहे. शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी आणि नागरिकांना आकर्षक विरंगुळ्याचे ठिकाण मिळावे या उद्देशाने या पुलाचे सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम माजी आमदार सौ. हुस्नाबनू खलिफे व माजी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून सुरू झाले असून, लवकरच राजापूरकरांना नव्या पुलाचे दर्शन घडणार आहे.
ब्रिटिशकालीन काळात बांधलेला हा पूल राजापूर शहराचा ऐतिहासिक वारसा असून, शहराचे दोन भाग जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. पुलावरून दररोज असंख्य नागरिकांची ये-जा होते, तसेच सायंकाळच्या वेळी हे ठिकाण नागरिकांच्या गप्पाष्टकांचे आवडते ठिकाण असते. अनेक वर्षांपासून या पुलाच्या सुशोभीकरणाची मागणी शहरवासीयांकडून होत होती.
या मागणीची दखल घेत माजी आमदार हुस्नाबनू खलिफे व माजी नगराध्यक्ष जमीर खलिफे यांनी निधी उपलब्ध करून देत कामाला गती दिली. सध्या या पुलावर आकर्षक रेलिंग, बसण्यासाठी बाके आणि सुंदर प्रकाशयोजनेचे काम पूर्णत्वाकडे आहे. सुशोभीकरणानंतर हा पूल शहराचे सौंदर्य वाढवणारा तसेच पर्यटकांचे लक्ष वेधणारा नवा आकर्षणबिंदू ठरणार आहे.
या उपक्रमामुळे राजापूर शहराचे रूप अधिक आकर्षक होणार असून, नागरिकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे. शहराचा इतिहास आणि आधुनिकता यांचा संगम घडवणारा हा प्रकल्प खलिफे यांच्या प्रयत्नांचे फलित ठरत आहे.
ब्रिटिशकालीन नन्हेसाहेब पुलाला चढणार नवा साज..!
