GRAMIN SEARCH BANNER

दिवाळीतील ‘आनंद’ हरपला! आर्थिक चणचणीमुळे ‘आनंदाचा शिधा’ योजना कागदावरच

Gramin Varta
103 Views

मुंबई : राज्यातील गोरगरिबांना सणासुदीचे दिवस आनंदाने साजरे करता यावेत, यासाठी महायुती सरकारने तीन वर्षांपूर्वी सुरू केलेली ‘आनंदाचा शिधा’ योजना आर्थिक चणचणीमुळे कागदावरच राहिली आहे.गणेशोत्सवापाठोपाठ दिवाळीलाही नागरिकांना हा शिधा मिळणार नाही. बहुधा ही योजना कायमचीच बंद केली जाण्याची चिन्हे आहेत.

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने निवडणुकीनंतर सत्तेवर येण्यासाठी लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज, आनंदाचा शिधा योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थाटन योजना यासह अनेक लोकप्रिय योजनांची घोषणा केली होती. निवडणुकीनंतर सत्तेवर येताच आर्थिक चणचणींमुळे अनेक लोकप्रिय योजनांना कात्री लागण्यास सुरुवात झाली. यंदा दिवाळीत सर्वसामान्यांना आनंदाचा शिधा देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

लाडकी बहीण, शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना मोफत वीज आदी कोणत्याही योजना बंद केल्या जाणार नाहीत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी अनेकदा जाहीर केले. मात्र लाडकी बहीण, शेतकऱ्यांना मोफत वीज यांसह काही मोजक्या योजना सोडल्या, तर अनेक योजनांसाठी निधीच न देण्याचे धोरण स्वीकारल्याने त्या केवळ कागदावर उरल्या आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शिवजयंती, गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गणेशोत्सव आणि दसरा-दिवाळी या उत्सवांच्या काळात सर्वसामान्यांना आनंदाचा शिधा दिला होता. पांढरी शिधापत्रिकाधारक वगळून अन्य प्रत्येक शिधापत्रिकेसाठी प्रत्येकी एक किलो पामतेल, रवा, चणाडाळ व साखर असे चार जिन्नस १०० रुपयांमध्ये देण्यात येत होते. त्याचा लाभ एक कोटी ७२ लाख शिधापत्रिकाधारकांनी घेतला होता आणि राज्य सरकारने २४०० कोटी रुपये खर्च केले होते. मात्र विधानसभा निवडणूक होऊन महायुती सरकार सत्तेवर आल्यापासून आनंदाचा शिधा योजनेसाठी निधीच देण्यात आलेला नाही. प्रत्येक सणासुदीच्या एक-दीड महिना आधी अन्न व नागरी पुरवठा विभागाला मुख्यमंत्री कार्यालयाकडून सूचना देण्यात आल्यावर मंत्रिमंडळासाठी प्रस्ताव सादर केला जातो आणि ६०२ कोटी रुपये निधीची तरतूद केली जाते. त्यानंतर निविदा प्रक्रिया होऊन निधीचे वाटप होते. अन्न व नागरी पुरवठा विभाग ही या योजनेसाठी केवळ समन्वयक (नोडल एजन्सी) असून ही खात्याची योजना नसल्याने निधी नाही. मुख्यमंत्री कार्यालयाकडून अद्याप तरी सूचना न मिळाल्याने यंदाच्या दिवाळीत आनंदाचा शिधावाटपासाठी निधीचा प्रस्ताव तयार करण्यात आला नसल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

पूरग्रस्तांना दिलासा नाही

यंदा गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील बऱ्याच भागात अतिवृष्टीचा तडाखा बसल्याने ६० लाख हेक्टरवरील पिके वाया गेली आहेत. लाखो शेतकऱ्यांना मदत पोहोचलेली नाही. अशा परिस्थितीत त्यांना दिवाळीत तरी दिलासा देण्याबाबत आनंदाचा शिधा योजनेचा लाभ सरकारकडून देण्यात येईल, अशी अपेक्षा होती. मात्र दिवाळी दोन आठवड्यांवर आलेली असताना शासकीय पातळीवर याबाबत कोणतीही हालचाल सुरू झाली नसून इतक्या कमी कालावधीत आनंदाचा शिधावाटप करणे अवघड असल्याचे उच्चपदस्थांनी सांगितले.

Total Visitor Counter

2646994
Share This Article