वाढीव बिलांचा आणि वीज खंडित होत असल्याने नागरिक संतप्त
दाभोळ: दाभोळ येथील महावितरणच्या अनागोंदी कारभाराला कंटाळलेल्या नागरिकांनी आज शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयावर धडक देत ‘हल्लाबोल’ मोर्चा काढला. वाढीव वीजबिले आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
गेल्या काही दिवसांपासून दाभोळमधील जनतेला महावितरणच्या ढिसाळ कारभाराचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यात दिवसातून अनेकवेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याआधीही नागरिकांनी कार्यालयात येऊन जाब विचारला होता, मात्र परिस्थितीत सुधारणा न झाल्याने आज शिवसेनेने थेट महावितरणचे अधिकारी विवेक येलवे यांना घेराव घालत जाब विचारला.
एकिकडे महावितरणकडून भरमसाट बिले दिली जात असताना, दुसरीकडे वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याबद्दल शिवसेनेने तीव्र संताप व्यक्त केला. १० ते १५ दिवस वीज नसतानाही जास्त बिले का येतात, असा सवालही यावेळी विचारण्यात आला. तसेच, महावितरणच्या नियंत्रण कक्षातील अधिकारी फोन उचलत नसल्याने तक्रार कुठे करावी, असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला.
या सर्व तक्रारींवर तातडीने उपाययोजना करून गावातील सर्व भागांमध्ये अखंडित वीजपुरवठा करण्याची मागणी शिवसेनेने केली. अन्यथा, पक्षाकडून कठोर भूमिका घेत जनतेसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला. यावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सर्व स्तरांवर योग्य ती उपाययोजना सुरू असून आवश्यक ती कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिली. येणाऱ्या दिवसात या प्रकरणात तातडीने लक्ष घालण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. मात्र, वीजपुरवठा तत्काळ नियमित न झाल्यास महावितरण कार्यालयाला पुन्हा घेराव घालण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.