दापोली : तालुक्यातील मुर्डी नवखंडा शिवारात गुरे चारण्याच्या वादातून निर्माण झालेल्या गैरसमजातून एका व्यक्तीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (९ जुलै) दुपारी घडली. या हल्ल्यात एकनाथ जगन्नाथ राऊत (वय ३९, रा. मुर्डी तेलेवाडी) हे गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास राऊत हे आपल्या गुरांना शेतात हाक देत होते. त्यावेळी त्यांच्या हातातील काठी आरोपी विश्वास रामचंद्र महाडिक (रा. आंजर्ले कातळकोड) याला उद्देशून दाखवली जात आहे, असा गैरसमज झाल्याने दोघांत वाद निर्माण झाला. या वादाचे पर्यवसान हल्ल्यात झाले. संतप्त झालेल्या विश्वास महाडिक याने राऊत यांच्यावर शिवीगाळ करत कोयत्याने अचानक हल्ला केला.
या हल्ल्यात राऊत यांच्या डाव्या हाताच्या मनगटाला गंभीर इजा झाली असून, त्यांच्या डोक्याला, हनुवटीला जखम झाली आहे. विशेष म्हणजे या मारहाणीत त्यांचा एक दातही पडल्याचे समोर आले आहे. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी हस्तक्षेप करून राऊत यांना तातडीने दवाखान्यात दाखल केले.
या प्रकरणी राऊत यांनी दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, विश्वास महाडिक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, शेतशिवारात घडलेली ही घटना स्थानिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.
दापोलीत गुरे चारण्याच्या वादातून कोयत्याने हल्ला; एकाचा दात पाडला
