मुंबई : एड्स रुग्णांची काळजी आणि त्यांना उपचार सेवा पुरविण्यासाठी देशातील सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून महाराष्ट्राचा केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेद्वारे (नॅको) गौरव करण्यात आला आहे.
राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या राष्ट्रीय आढावा बैठकीत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे १२ नोव्हेंबर रोजी झालेल्या केंद्रीय समारंभात महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेला (एमएसएसीएस) या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले. नॅकोच्या काळजी आधार आणि उपचार विभागाच्या प्रमुख डॉ. चिन्मयी दास यांच्या हस्ते हा पुरस्कार एमएसएसीएसचे उपसंचालक डॉ. प्रियांका वाघेला आणि सहाय्यक संचालक प्रदीप सोनवणे यांनी स्वीकारला. हा सन्मान महाराष्ट्राच्या प्रमुख आरोग्य निर्देशांकांमधील, विशेषतः एचआयव्हीसह जगणाऱ्यासाठी अँटी रेट्रोव्हायरल थेरपी उपचार सेवा पुरवण्यात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी देण्यात आला आहे.
नॅकोच्या कामगिरी निर्देशांकानुसार ‘ग्रीन झोन’मध्ये सर्वाधिक अँटी रेट्रोव्हायरल उपचार केंद्रे असल्यामुळे एमएसएसीएसने आपले अव्वल स्थान मिळवले आहे. या केंद्रांनी अनेक महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. यामध्ये नोंदणीकृत सर्व एचआयव्ही व्यक्तींसाठी सर्वसमावेशक एआरटी उपचार सुनिश्चित करणे, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि आधार यांचा समावेश आहे. तसेच राज्यांचे मूल्यांकन करताना एकात्मिक सल्ला व चाचणी, आयसीटीसी केंद्रातून तपासणी करून एआरटी उपचार केंद्रात उपचार सेवेचा लाभ घेणे, समुपदेशनानुसार उपचारविषयक नियमांचे पालन करणे, विषाणूभार नियंत्रणात ठेवणे आणि सातत्यपूर्ण काळजी घेणे या बाबींचा समावेश आहे. महाराष्ट्राने या मानंकाची सातत्यपूर्ण पूर्तता करण्यात यश मिळवले आहे.
सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे सचिव १ डॉ. निपुन विनायक यांच्या कुशल नेतृत्व आणि सुयोग्य मार्गदर्शनामुळे हे यश मिळाले असून, हा पुरस्कार एचआयव्हीसह जगणाऱ्याासाठी विनामूल्य आणि सुलभ आधार पुरवण्यासाठी राज्य कटिबद्ध असल्याचे सिद्ध करतो, तसेच राज्याच्या सर्वसमावेशक आरोग्य आणि कल्याणकारी उपक्रमांचे यश दर्शवितो, असे एमएसएसीएसचे पकल्प संचालक डॉ. सुनील भोकरे यांनी नमूद केले.
राज्यातील सर्वोत्तम एआरटी केंद्रे
सप्टेंबर २०२५ च्या अंतिम गुणपत्रिकेत ७५ हून अधिक गुण मिळवलेल्या ‘ग्रीन झोन’मधील १६ केंद्रांपैकी नांदेड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, एएफएमसी पुणे, पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय, सोलापूरमधील डॉ वैश्यपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सास्तूर ग्रामीण रुग्णालय, धाराशिव जिल्हा रुग्णालय या केंद्रांचा सर्वोत्कृष्ट एआरटी केंद्र म्हणून सत्कार करण्यात आला.
सेवेमध्ये सुधारणा करणारी केंद्रे
उदगीर उपजिल्हा रुग्णालय, लातूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संभाजीनगरमधील वैजापूर उपजिल्हा रुग्णालय या एआरटी केंद्रांना काळजी आधार आणि उपचार विषयक सेवा प्रदान करण्यात लक्षणीय सुधारणा केल्याबद्दल गौरविण्यात आले आहे. त्यांनी मागील गुणपत्रिकेतील गुणांच्या तुलनात्मक दृष्ट्या यंदाच्या अंतिम गुणपत्रिकेत महत्त्वपूर्ण सुधारणा केली आहे.
खाजगी वैद्यकीय संस्थांमधील एआरटी केंद्रे
पुण्यातील काशिबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूरमधील लोटस मेडिकल फाउंडेशन या खाजगी वैद्यकीय संस्थांमधील दोन एआरटी केंद्रांचा ‘ग्रीन झोन’मध्ये राहिल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
एड्स रुग्णांना उपचार पुरविण्यात महाराष्ट्र देशात अव्वल; महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेला पुरस्कार






