GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी जिल्ह्यात गौराइचे वाजत गाजत आगमन

Gramin Varta
10 Views

रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. गणेशा पाठोपाठ रविवारी गौराईचे आगमन घराघरात झाल्याने गणेशोत्सवाचा उत्साह आणखी वाढला आहे. कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात गणेश आगमनाने उत्साहाचे वातावरण आहे. भाद्रपद महिन्यात येणाऱ्या या सणाला कोकणात विशेष महत्त्व असल्याने या उत्साहात गौराईच्या आगमनाने आणखीनच उत्साह वाढला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात अनेक घरांमध्ये गौराईचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. यावर्षी, सोमवार १ सप्टेंबर रोजी ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीचे पूजन केले जाणार आहे.कोकणात गौरी सणाला वेगळे महत्व आहे. गौरीला साक्षात महालक्ष्मीचे रूप म्हणून ओळखले जाते. सौभाग्य आणि समृद्धीची देवता म्हणून विवाहित स्त्रिया या सणात मोठ्या भक्तिभावाने गौराईचे पूजन करीत असतात. गौराईचे पूजन कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी करण्यात येते.

जिल्ह्यात गौराई पूजनाचा उत्सव तीन दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पहिल्या दिवशी गौरी आवाहन म्हणजेच गौरीला घरी आणले जाते. यावेळी नदी किंवा तलाव अशा पाणवठ्याच्या ठिकाणंचे खडे आणून त्यांची पूजा केली जाते. मुखवट्याची व हात पाय असलेल्या मूर्तीची स्थापना यावेळी करण्यात येते.

दुसऱ्या दिवशी गौरी पूजनाचा कार्यक्रम केला जातो. यावेळी गौरीला नवीन वस्त्र, दागिने आणि इतर सौभाग्य अलंकार अर्पण करून तीची पूजा केली जाते. या दिवशी पाच प्रकारच्या भाज्या आणि विविध पक्वान्नांचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. काही ठिकाणी गौरी सणाला मांसाहारी नैवेद्य दाखविला जातो. यावर्षी गौराईचे आगमन पूर्वनक्षत्रावर झाल्याने अनेक घरांमध्ये नवविवाहित वधूंचा पहिला ‘ओवसा’ भरण्याचा कार्यक्रम पार पाडला जातो. ओवसा म्हणजे देवीला ओवाळणे, हा एक सौभाग्य प्राप्त करण्याचा महत्त्वाचा विधी मानला जातो. तसेच तिसऱ्या दिवशी, मूळ नक्षत्रावर, गौरी विसर्जन करुन मोठ्या भक्ती भावाने गणेशाला व गौरीला निरोप दिला जातो.

Total Visitor Counter

2648199
Share This Article