मुंबई : मुंबईच्या गुंदवली मेट्रो स्टेशनवर गेल्या काही दिवसांपासून एका मांजराची चांगलीच चर्चा रंगली आहे. स्टेशनवर आरामात फिरणाऱ्या आणि प्रवाशांवर नजर ठेवणाऱ्या या मांजराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन अर्थात MMMOCL ने चक्क या मांजराला ‘Chief Feline Officer’ हे मजेशीर पद दिले आहे. या मांजराची स्टेशन पाहणी, प्रवाशांवर लक्ष ठेवणे आणि सर्वांना दिसेल अशा ठिकाणी बसणे, अशी ‘ड्युटी’ही कंपनीने गंमतीने ठरवली आहे.
गुंदवली मेट्रो स्टेशनच्या गेटजवळ बसलेल्या या मांजराचा फोटो प्रवासी संदेश सामंत यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. स्टेशनवर हे मांजर सातत्याने दिसत असल्याने त्यांनी MMMOCL ला टॅग करत, ते इतके दिवस विनावेतन सेवा बजावत आहे, त्यामुळे त्याला सरकारी नोकरी देण्यात यावी, अशी मिश्कील मागणी केली.
प्रवाशाच्या या विनोदी मागणीला MMMOCL नेही तितक्याच मिश्कील अंदाजात प्रतिसाद दिला. कंपनीने या मांजराची ‘Chief Feline Officer’ म्हणून नियुक्ती केल्याचे जाहीर केले. स्टेशनची पाहणी करणे, प्रवाशांवर लक्ष ठेवणे आणि योग्य ठिकाणी बसून परिस्थितीवर नजर ठेवणे ही त्याची जबाबदारी असल्याचे कंपनीने सांगितले. विशेष म्हणजे, आतापर्यंत या ‘अधिकाऱ्याची’ कामगिरी उत्तम असल्याचेही MMMOCL ने गंमतीने नमूद केले.
व्हायरल व्हिडिओमध्ये हे मांजर मेट्रो स्टेशनवर अत्यंत निवांतपणे फिरताना, बसताना आणि येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांकडे पाहताना दिसते. मेट्रो पकडण्यासाठी प्रवाशांची लगबग सुरू असताना हे मांजर मात्र आपल्या जागेवर अगदी शांतपणे बसलेले दिसते. त्याचा हा निश्चिंत अंदाजच सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या पसंतीस उतरला आहे.
व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या मांजराला स्टेशनचा ‘बॉस’ म्हणण्यास सुरुवात केली आहे. काहींनी त्याला ओळखपत्र आणि गणवेश देण्याची मागणी केली, तर काहींनी त्याची ड्युटी २४ तासांची असल्याची मिश्कील टिप्पणी केली. एका वापरकर्त्याने तर तो दररोज सकाळी उठल्यानंतर स्टेशनवर या मांजराला शोधत असल्याचे म्हटले आहे.
या मांजराच्या उपस्थितीने मुंबई मेट्रोच्या प्रवाशांना मनोरंजनाचा एक वेगळाच विषय मिळाला असून, सोशल मीडियावर त्याच्यावर विनोदी प्रतिक्रिया आणि कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. मेट्रो स्टेशनवरील या ‘नव्या अधिकाऱ्याची’ नियुक्ती सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे.
मुंबई: ना परीक्षा, ना मुलाखत… थेट मेट्रोमध्ये नोकरी! मांजरीची अधिकारीपदी नियुक्ती; ड्युटीही ठरली
Leave a Comment







