कोल्हापूर: कोल्हापूर सर्किट बेंचचे लवकरच खंडपीठात रूपांतर होईल, असा विश्वास आज भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केला. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन भारताचे सरन्यायाधीश भूषण कोल्हापूर,गवई यांच्या हस्ते फित कापून व कोनशिलेचे अनावरण करुन करण्यात आले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, व मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्किट बेंच इमारतीच्या उद्घाटनाचा भव्य सोहळा पार पडला. यावेळी सरन्यायाधीश भूषण गवई बोलत होते.
प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धैर्यशील माने उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की ५० वर्षाच्या लढ्याचे शिवधनुष्य सरन्यायाधीश भुषण गवई यांनी समर्थपणे पेलले आहे. सर्किट बेंचमुळे कोल्हापूरात विकासाचे नवे दालन खुले झाले आहे. या माध्यमातून कोल्हापूरच्या इतिहासाला साजेसे काम करू अशी ग्वाही दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ म्हणाले की शेकडो मैल दूर असलेला न्याय आता आपल्या दारी आला आहे.
यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती चंद्रशेखर, सर्किट बेंचसाठी नियुक्त केलेले न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, न्यायमूर्ती शिवकुमार दिगे, न्यायमूर्ती शर्मिला देशमुख, न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर, तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे, कोल्हापूर जिल्हा पालक न्यायमूर्ती मनीष पितळे, न्यायमूर्ती अनिल किलोर तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, आमदार चंद्रदीप नरके, आमदार शिवाजी पाटील, ज्येष्ठ संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त के.मंजूलक्ष्मी, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुणे विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पोलीस विभागाने उपस्थित मान्यवरांना गार्ड ऑफ ऑनर दिले. यानंतर सरन्यायाधीश भूषण गवई, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सह मान्यवरांनी सर्किट बेंच इमारत परिसराची पाहणी करुन झालेल्या कामाबद्दल कौतुक केले.
सीपीआरच्या समोर असणाऱ्या या सर्किट बेंच इमारतीसाठी 46 कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाच्या वतीने मंजूर झाला आहे. जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस विभाग यांच्या समन्वयातून येथील इमारतींचे व या परिसराचे कमीत कमी वेळेत उत्कृष्ट पद्धतीने नूतनीकरण करण्यात आले आहे.