तुषार पाचलकर/ राजापूर : राजापूर तालुक्यातील पाचल येथील बँक ऑफ इंडिया शाखेत मराठी भाषेचाच वापर करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) उप तालुका अध्यक्ष मंगेश नारकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी शाखाधिकाऱ्यांना लेखी पत्र दिले असून, त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणीही केली आहे.
पाचल ही तालुक्यातील एक मोठी बाजारपेठ असून, सुमारे ३० ते ३५ गावातील ग्राहकांचा या बँकेशी संबंध येतो. या बँकेत व्यवहार करणारे बहुतांशी ग्राहक हे मराठी भाषिक आहेत, त्यामुळे त्यांचे सर्व व्यवहार मराठी भाषेतून होत असतात. मात्र, बँकेतील बहुतांशी कर्मचारी हिंदी भाषिक असल्याने ते हिंदीचा वापर करतात, असे नारकर यांनी निवेदनात म्हटले आहे.
राज्य सरकारच्या धोरणानुसार बँकेत सर्वसामान्यांना समजेल अशा मराठी भाषेचा वापर झाला पाहिजे, अशी मागणी मनसेने केली आहे. मनसेचे उप तालुका अध्यक्ष मंगेश नारकर यांच्यासह शाखा अध्यक्ष शिरीष सुतार, रमाकांत नेमण, अमित तोडकरी, केशव कांबळे यांच्या वतीने हे निवेदन शाखाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. मराठी भाषेचा वापर न झाल्यास मनसे आंदोलनाचा पवित्रा घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजापूर: बँक ऑफ इंडियाच्या पाचल शाखेत मराठी भाषेच्या वापराची मनसेची मागणी
