3 रुग्णालयात फिरवले मात्र हाती लागलीच नाही
गुहागर: तालुक्यातील नम्रता संदेश निवाते (वय ३४, रा. पेचे आमशेत, भोदवाडी, ता. गुहागर) या विवाहितेचा सर्पदंशामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला. २६ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता चिपळूण येथील वालावलकर हॉस्पिटल, डेरवण येथे तिने अखेरचा श्वास घेतला. याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या महिलेला 3 रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र कोणतेही डॉक्टर तिला वाचवू शकले नाहीत.
मिळालेल्या माहितीनुसार, नम्रता निवाते यांना २२ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७.३० वाजता शेजारील घरी पायी चालत जात असताना कोणत्यातरी विषारी सापाने दंश केला. कुटुंबियांनी तातडीने त्यांना उपचारासाठी हलवले.
उपचारांची तीन केंद्रांमध्ये धावपळ
सर्पदंश झाल्यानंतर नम्रता निवाते यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र, तळवली येथे प्रथमोपचार देण्यात आले. मात्र, प्रकृतीची गंभीरता लक्षात घेऊन त्यांना तेथून सरकारी हॉस्पिटल, गुहागर आणि त्यानंतर सरकारी हॉस्पिटल, कामथे, ता. चिपळूण येथे हलवण्यात आले.
कामथे येथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, अधिक आणि अद्ययावत उपचारांसाठी नम्रता यांना २३ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २.३० वाजता वालावलकर रुग्णालय, डेरवण येथे दाखल करण्यात आले.
गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर तिथे उपचार सुरू होते. मात्र, उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने २६ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
गुहागरमध्ये सर्पदंश झालेल्या महिलेचा सावर्डेत मृत्यू
