GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण: विद्युत तारेच्या धक्क्याने म्हशींच्या मृत्यू प्रकरणी मिरजोळीचा तत्कालीन वायरमन निलंबित

Gramin Varta
23 Views

चिपळूण: मिरजोळी-कोलेखाजन येथे काही दिवसांपूर्वी तुटलेल्या विद्युत तारेच्या धक्क्याने पाच दुभत्या म्हशींचा मृत्यू झाल्याप्रकरणी, हलगर्जीपणाचा ठपका ठेवत मिरजोळी येथील तत्कालीन वायरमन मुदस्सर खान यांना निलंबित करण्यात आले आहे. या घटनेशी संबंधित काही अधिकाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेतील अधिवेशनात यासंदर्भात उपस्थित केलेल्या लक्षवेधीनंतर ही कारवाई करण्यात आल्याने महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

जून महिन्यात मिरजोळी-कोलेखाजन परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे विद्युत तार तुटून पडली होती. या तारेच्या धक्क्याने प्रमोद कदम यांच्या सहा म्हशींना जबर धक्का बसला. त्यापैकी पाच म्हशींचा जागीच तडफडून मृत्यू झाला, तर एक म्हैस गंभीर जखमी झाली होती. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी महावितरणच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्या मध्यस्थीनंतर, कदम यांना नुकसान भरपाई देण्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले आणि ती देण्यातही आली.

मात्र, महावितरणकडून प्रत्यक्षात दिली जाणारी नुकसान भरपाई कमी असल्याचा मुद्दा आमदार शेखर निकम यांनी अधिवेशनात उपस्थित केला होता आणि मदतीची रक्कम वाढवण्याची मागणी केली होती. दुसरीकडे, आमदार भास्कर जाधव यांनी घटना घडल्यानंतर अधिकारी आणि कर्मचारी वेळेत घटनास्थळी पोहोचले नाहीत, त्यांच्या हलगर्जीपणामुळेच पाच म्हशी ठार होऊन शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले, त्यामुळे त्यांच्यावर काय कारवाई केली, असा प्रश्न उपस्थित केला. आमदारांच्या या आक्रमक भूमिकेनंतर, महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करत वायरमन मुदस्सर खान यांना निलंबित केले असून, काही संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. या कारवाईमुळे महावितरणच्या अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Total Visitor Counter

3366850
Share This Article