GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीतील १३ वर्षीय सृजन पटवर्धनने अत्यंत कठीण लिंगाणा सुळका केला सर

Gramin Varta
49 Views

रत्नागिरी : लिंगाणा सुळक्यावर यशस्वी आरोहण करणे हे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न मानले जाते. या अत्यंत कठीण आणि धाडसी आव्हानाला रत्नागिरीतील अवघ्या १३ वर्षीय सृजन सतीश पटवर्धन याने यशस्वीपणे सामोरे जात लिंगाणा सुळका सर केला. ‘जिद्दी माउंटेनिअरिंग’ या अनुभवी संघाच्या नेतृत्वाखाली ही मोहीम नुकतीच पार पडली.

सृजन हा रत्नागिरी येथील दामले हायस्कूलचा विद्यार्थी असून, एवढ्या कमी वयात त्याने साधलेले हे यश सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. लिंगाणा किल्ला आणि सुळका हे गिर्यारोहकांसाठी अतिशय जोखमीचे मानले जातात. तीव्र कातळ, उंची आणि तांत्रिक चढाई यामुळे येथे आरोहण करणे मोठे धैर्य आणि कौशल्य मागते. योग्य प्रशिक्षण, शिस्तबद्ध तयारी आणि स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर सृजनने हे आव्हान यशस्वीपणे पेलले.

‘जिद्दी माउंटेनिअरिंग’ ही संस्था महाराष्ट्रात गिर्यारोहण व साहसी मोहिमांचा प्रसार करणारी एक महत्त्वाची संस्था म्हणून ओळखली जाते. या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली सृजनने यापूर्वीही वजीर, सुळक्या, भांबुर्डे नवरा-नवरी आणि करवली या सुळक्यांवर यशस्वी आरोहण केले आहे.

लहान वयातच गिर्यारोहण क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करत सृजन पटवर्धनने आपली क्षमता सिद्ध केली असून, भविष्यात त्याच्याकडून आणखी मोठ्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Total Visitor Counter

3072103
Share This Article