माऊली नगर येथील रहिवासी रोहित सुर्वे यांची नगर पंचायतीकडे तक्रार
लांजा : निवासी इमारतीमधील सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याबाबत कोणतीही उपाय योजना न करता हे सांडपाणी उघड्यावर सोडण्यात आल्याने स्थानिक रहिवाशांचे जीवनमान धोक्यात आले असून विहिरींचे पाणी देखील प्रदूषित होण्याचा धोका आहे निर्माण झाल्याची तक्रार लांजा माऊली नगर येथील रहिवासी रोहित सुर्वे यांनी नगर पंचायतीकडे केली आहे.
लांजा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील माऊली नगर येथे लेविश ही निवासी इमारत असून या इमारतीच्या सांडपाण्यासाठी कोणत्याही प्रकारची कार्यवाही (सांडपाणी प्रक्रिया सयंत्र) न करता हे सांडपाणी उघड्यावर खड्डा मारून सोडण्यात आलेले आहे.
याप्रकरणी येथील रोहित सुधीर सुर्वे यांनी लांजा नगरपंचायतीकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, माऊली नगर येथील आमच्या प्लॉट शेजारी लेविश ही रहिवासी इमारत असून या इमारतीच्या सांडपाण्यासाठी ते पाणी मुरण्यासाठी मोठा खड्डा मारला आहे. त्यात त्यांनी एक ओवर फ्लो पाईप देखील दिलेला आहे. खड्ड्यात साठलेले सांडपाणी बाहेरील रस्त्यालगतच्या भागात येत आहे आणि तिथून ते आमच्या प्लॉट शेजारून वाहत आहे. या शेजारी आमची पिण्याची पाण्याची विहीर असून ती फक्त ३५ फूट खोल आहे. लेविश इमारतीचा सांडपाण्याचा खड्डा आमच्या विहिरीपासून अंदाजे १०२ फूट अंतरावर आहे. त्यामुळे ओव्हरफ्लोचे वाहणारे सांडपाणी हे आठ फुटांवरून विहिरीजवळून वाहत असल्याने आमच्या विहिरीचे पाणी प्रदूषित होण्याची शक्यता असून आमच्या तसेच येथील जमिनीतील नैसर्गिक पिण्याच्या पाण्याचे साठे देखील पूर्णपणे दूषित होण्याचा संभव आहे, अशी तक्रार त्यांनी लांजा नगरपंचायतीकडे केली आहे.
निवासी इमारतीतील पाणी हे उघड्यावर सोडण्यात आल्याने विहिरीचे पाणी दुषीत होण्याबरोबरच सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ही बाब हानीकारक आहे. मात्र तक्रार करून महिनाभराचा कालावधी उलटून गेला तरी देखील नगरपंचायतीकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचे सुर्वे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, या सांडपाण्यामुळे आपल्या विहिरीचे नैसर्गिक पाणी स्रोत प्रदूषित झाल्यास त्याची नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी लेविश इमारत आणि लांजा नगरपंचायत यांची राहील असा इशारा रोहित सुर्वे यांनी दिला आहे.