GRAMIN SEARCH BANNER

पोलीस अंमलदार सचिन कामेरकर यांना ‘विश्व समता प्रज्ञा गौरव सन्मान’

संगमेश्वर/दिनेश अंब्रे:संगमेश्वर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष आणि सामाजिक जाणीव असलेले पोलीस हवालदार सचिन कामेरकर यांना ‘विश्व समता कला मंच, लोवळे – संगमेश्वर’ या संस्थेच्यावतीने ‘विश्व समता प्रज्ञा गौरव सन्मान’ प्रदान करून गौरविण्यात आले.

सामाजिक भान राखून सेवा देणारे, नागरिकांशी संवाद साधणारे, मानवतावादी दृष्टिकोनातून काम करणारे पोलीस अधिकारी म्हणून कामेरकर यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या सामाजिक, कला व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मनोज जाधव यांच्या संकल्पनेतून या सन्मानाचे आयोजन करण्यात आले.

सन्मान वितरण सोहळ्यात संगमेश्वर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शंकर नागरगोजे, उपनिरीक्षक प्रशांत शिंदे, तसेच संस्थेचे मार्गदर्शक दिनेश अंब्रे यांच्या हस्ते कामेरकर यांना गौरवपत्र आणि पुष्पगुच्छ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमास पत्रकार खातू, पोलीस उपनिरीक्षक गावित, महिला पोलीस अंमलदार, पोलीस अंमलदार, तसेच सचिन कामेरकर यांचे मित्रमंडळ आणि परिसरातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सन्मान स्वीकारल्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना कामेरकर यांनी सांगितले की, “हा सन्मान माझ्यासाठी अभिमानास्पद असून, यामुळे माझ्यावरची जबाबदारी अधिक वाढली आहे. सामाजिक कार्याची ही दखल घेतल्याबद्दल मी संस्थेचे मनःपूर्वक आभार मानतो.”

या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडले.

Total Visitor Counter

2475317
Share This Article