रत्नागिरी : शहरातील पॉवर हाऊस ते नाचणे मार्गावर लावण्यात आलेल्या झेंडयाची काठी डोळ्यात घुसून डोळा निकामी होण्याची शक्यता वाहन चालकांकडून व्यक्त होत आहे.
रत्नागिरी शहरात एका हॉस्पीटलच्या लोकार्पण सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी नाचणे मार्गावर काठीमध्ये अडकवलेले झेंडे डिव्हायडरवरील वीज खांबावर लावले होते. दीड महिन्यांहून अधिक कालावधी लोटला तरी झेंडे काढण्यात आलेले नाहीत. परिणामी या खांबावर लावलेले झेंडे सध्या खाली आले आहेत. झेंडयाच्या काठ्या रस्त्यावर अर्ध्यापर्यंत आल्याने दुचाकीस्वाराच्या डोळ्यात घुसून डोळा फुटण्याची मोठी दुर्घटना होऊ शकते. एखाद्या वाहन चालकाचा डोळा निकामी झाल्यास जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकाराने नगर परिषदेच्या ढिसाळ कारभाराचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. नगर परिषदेने याकडे लक्ष देऊन पुढील दुर्घटना टाळण्यासाठी वेळीच हे झेंडे काढणे गरजेचे होते. मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे.
पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी शहरातील बॅनर काढण्याचे आदेश दिले आहेत. मात्र हे बॅनरही मारुतीमंदिरपासून स्टॅण्ड पर्यंत अद्यापही दिसून येत आहेत. कालच मारुती मंदिर येथील कार्निवल हॉटेल समोरील डीव्हाइडर लावण्यात आलेला जाहिरातीचा लोखंडी खांब मुळासहित कोसळून पडला आहे. सुदैवाने हा लोखंडी खांब एखाद्या वाहन चालकांवर अथवा दुचाकीस्वारावर कोसळला नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. या गोष्टीकडे नगर परिषद लक्ष देणार का? की जीव गेल्यानंतरच जाग येणार असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
रत्नागिरी नाचणे मार्गावर अडकवलेल्या झेंड्याची काठी दुचाकीस्वाराच्या डोळ्यात घुसून अपघाताची शक्यता
