सातारा : अपघात करून पळून जाणाऱ्या रिक्षाचालकाने एका महिला पोलिसाला सुमारे शंभर मीटर फरफटत नेले. यामध्ये महिला पोलीस गंभीर जखमी झाली आहे. रिक्षाचालकाला ताब्यात घेण्यात आले असून, शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघात जात असलेल्या रिक्षाचालकाला संबंधित महिला पोलीसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो भरधाव पुढे जात होता. एक किलोमीटर अंतरापर्यंत हा पाठलाग सुरू असताना या झटापटीत त्यांच्या गणवेशाची टोपी रिक्षात अडकली. त्यामुळे त्या खाली पडल्या, तरी चालकाने रिक्षा थांबविली नाही. सुमारे १०० मीटर त्यांना फरफटत नेले.
हवालदार भाग्यश्री जाधव असे जखमी पोलीस महिलेचे नाव आहे. सायंकाळच्या सुमारास येथील मुख्य बस स्थानकाबाहेर वाहतूक नियमनासाठी कार्यरत असताना, त्यांना पोलीस कंट्रोलमधून एका रिक्षाचालकाने (एमएच ०२ एस ७२०८) मोळाचा ओढा परिसरात अनेक दुचाकींना धडक दिल्याची माहिती कळविण्यात आली. या रिक्षाचा क्रमांकही सांगण्यात आला होता. डायल ११२ वर असलेल्या प्रतिनिधीने याबाबतची माहिती बस स्थानक परिसरात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना पाठविली. त्यामुळे पोलीस कर्मचारी सतर्क झाले. दरम्यान, काही वेळात तो रिक्षाचालक बस स्थानकाकडे भरधाव येत असल्याचे त्यांना दिसले.
या वेळी महिला पोलीस कर्मचारी भाग्यश्री जाधव यांनी त्याला पाहिले. रिक्षा क्रमांकाची खात्री केल्यानंतर त्यांनी संबंधित रिक्षाचालकाला थांबण्याचा इशारा केला. परंतु इशाऱ्याला न जुमानता त्याने रिक्षा भरधाव पुढे नेली. त्यामुळे परिसरात असलेल्या एका दुचाकीचालकाच्या मागे बसून जाधव यांनी त्या रिक्षाचा पाठलाग सुरू केला. त्यांनी दुचाकीवरून रिक्षाचालकाला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो भरधाव पुढे जात होता. एक किलोमीटर अंतरापर्यंत जाधवही त्याच्या मागे होत्या. या झटापटीत त्यांच्या गणवेशाची टोपी रिक्षात अडकली. त्यामुळे भाग्यश्री खाली पडल्या, तरी चालकाने रिक्षा थांबविली नाही. सुमारे १०० मीटर त्याने भाग्यश्री यांना फरफटत नेले. काही अंतर गेल्यावर रिक्षाचालकाने रिक्षा थांबविली. त्या वेळी मागून आलेल्या पोलिसांनी रिक्षाचालकाला ताब्यात घेतले. तो दारूच्या नशेत असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. त्यामध्ये भाग्यश्री यांच्या डोक्याला, शरीराला गंभीर जखमा झाल्या आहेत. भाग्यश्री यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साताऱ्यात अपघातानंतर रिक्षाचालकाने महिला पोलिसाला फरफटत नेले; महिला पोलीस गंभीर जखमी, चालक ताब्यात
