राजापूर : नागरिकांना होणाऱ्या प्रचंड उपद्रवानंतर अखेर बुधवारी राजापूर नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या पाच गुरांना पकडून कारवाईची सलामी दिली आहे. मात्र या कारवाईत सातत्य राहते का ? आणि मोकाट गुरांच्या मालकांवर प्रत्यक्षात दंडात्मक अथवा फौजदारी स्वरूपाची कारवाई होते का ? याच्या पडताळणीसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
राजापूरची नगर परिषद दरवर्षी नागरिकांकडून शंभर टक्के करवसूलीचे उद्दीष्ट्य ठेवत असली तरी गेले अनेक महिने राजापूर नगर परिषदेला पूर्ण सप्ताहभर हजर राहणारा मुख्याधिकारी नाही. त्यामुळे नागरी समस्यांबाबतच्या निर्णयासाठी असलेल्या प्रशासनाला आदेश अथवा सूचनांची प्रतिक्षा करावी लागते. त्यातच राजापूर नगर परिषदेचा पूर्वी असलेला मोकाट गुरांसाठीचा कोंडवाडा पाडण्यात आल्यानंतर कोट्यावधी रूपयांची बेफाट विकासकामे करणाऱ्या न.प.ने नवीन कोंडवाड्याचा प्रस्तावच तयार केलेला नाही. खासगी रिटेनिंग वॉल, वर्षादोन वर्षांत नादुरूस्त होणारे रस्ते यावरच निधी खर्च होत असताना जनतेच्या प्रत्यक्ष समस्येविषयी कोणालाच सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान रस्त्यावरील अतिक्रमणे, पार्कंगबाबत बेशिस्त शहर अशी ओळख निर्माण झालेली असताना सातत्याने प्रचंड तक्रारी झाल्यानंतर मोकाट गुरांबाबत न.प.च्या आरोग्य विभागाने अनेक महिन्यांनंतर हालचाल सुरू केली आहे. शहरातील रस्त्यांवर किमान पन्नासपेक्षा अधिक मोकाट गुरे फिरत असताना कारवाईच्या पहिल्याच दिवशी अशा पाच गुरांना पकडून न.प.च्या मालकीच्या जीर्ण विश्वश्रामगृहात विश्रामासाठी ठेवण्यात आली आहेत. आता या गुरांचे मालक तीन दिवसांत न आल्यास त्यांचा लिलाव करण्यात येणार असल्याचे प्रशासन सांगत आहे. मात्र मालकांचा शोध लागल्यास त्यांच्यावर किरकोळ दंडाची कारवाई करून विषय संपुष्टात आणणार की फौजदारी गुन्हा देखील नोंद करणार यावर शहरवासीय लक्ष ठेऊन आहेत.
राजापूर न.प.ने पकडली पाच मोकाट गुरेः मालकांविरोधातील कारवाईकडे लक्ष
