रत्नागिरी: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आघाडीतूनच लढविल्या जातील, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या राज्य उपाध्यक्षा नलिनी भुवड यांनी जाहीर केले.
रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची आढावा बैठक देवरूख येथील मराठा भवन येथे आज झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाला तळागाळा पर्यंत पोहोचविण्यासाठी झोकून देत काम करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश बने, उपाध्यक्ष मिलिंद कीर, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुयोग कदम. यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यात आली. जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढली असल्याचे विधानसभा निवडणुकीत दिसून आले आहे. त्यामुळे जनतेला भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी संघटित प्रयत्न केले गेले पाहिजेत. त्यासाठी प्रयत्नशील राहून निष्ठेने काम करून पक्षाला तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी झोकून देत काम करावे, असे आवाहन यावेळी कार्यकर्त्यांना करण्यात आले. पक्षाचे काम करताना पक्षातून कोण जातो आहे, कोण येतो आहे, याकडे दुर्लक्ष करून विचलित न होता जनतेच्या संपर्कात राहून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या भागातील गावे, वाडीवस्त्यांसह प्रभागातील जनतेला भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाध्यक्ष बने यांनी केले बैठकीच्या सुरुवातीला खेड येथील ज्येष्ठ नेते हिराभाई बुटाला यांना श्रद्धांजली अर्पण वाहण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला. बैठकीला जिल्हातील पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
रत्नागिरी : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आघाडीतूनच – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
