रत्नागिरी : ‘ट्रेड विथ जॅझ असोसिएट प्रा.लि. (TWJ)’ या पुणे स्थित कंपनीने ‘फ्रेंचायझी बिझनेस अॅग्रीमेंट’च्या नावाखाली अधिक परताव्याचे आमिष दाखवून राज्यभरातील अनेक गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. यवतमाळ शहरातील चौघा गुंतवणूकदारांची तब्बल ३९ लाख रुपयांनी फसवणूक झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर, या कंपनीने एकूण ३ कोटी ३१ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे राज्यभरातील गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली असून, त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.
याप्रकरणी, गजेंद्र श्रावण गणवीर (वय ५५, रा. अंबिकानगर, यवतमाळ) यांनी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक (MD) समीर नार्वेकर (वय ४०, रा. पुणे), संचालक नेहा समीर नार्वेकर (वय ३८, रा. पुणे), विभागीय व्यवस्थापक सागर मंचलवार (वय ३८, रा. संभाजीनगर, यवतमाळ), शाखा व्यवस्थापक सूरज मडगुलवार (वय ३७, रा. यवतमाळ), आणि लेखापाल नम्रता सूरज मडगुलवार (वय ३५, रा. यवतमाळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
४ टक्के व्याजाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले
कंपनीने गुंतवणूकदारांना दरमहा ३ ते ४ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवले होते. ‘ट्रेड विथ जॅझ’ची राज्यात तब्बल १६ शाखा असल्याचे सांगण्यात आले. कंपनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे प्रशिक्षण देते, असेही भासवण्यात आले. त्यांनी ‘TWJ इव्हेंट’, ‘TWJ इनका’, ‘TWJ हॉस्पिटॅलिटी’, ‘TWJ लर्निंग’ आणि ‘TWJ लॉजिस्टिक’ अशा विविध उपकंपन्या असल्याचा दावा केला. या उपकंपन्यांमध्ये गुंतवणूक करून मोठा नफा कमावण्याचे स्वप्न दाखवण्यात आले.
तक्रारदार गजेंद्र गणवीर यांच्या जावई ओमप्रकाश खांडेकर, रा. अमरावती यांनी या कंपनीत १० लाख रुपये गुंतवल्यानंतर, गणवीर यांनी जानेवारी २०२४ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत १४ लाख रुपयांची गुंतवणूक केली. त्यांच्यासोबतच त्यांचे लहान भाऊ सदानंद यांनी ५ लाख, तर वीरेंद्रसिंग चव्हाण यांनी १० लाख रुपयांची गुंतवणूक केली. अशा प्रकारे केवळ चार जणांची मिळून ३९ लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.