देवरुख : शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयात पर्यावरण जागृती व संवर्धनाच्या उद्देशाने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरुवात देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव शिरीष फाटक आणि प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वृक्ष देऊन करण्यात आली. या वेळी विविध प्रकारची सुमारे २०० झाडे लावण्यात आली. यामध्ये शिसम, फणस, चिंच, ताम्हण, वड, पिंपळ, कदंब, बहावा आणि शिवण आधी रोपांचा समावेश होता.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांनी हा उपक्रम केवळ झाडे लावण्यापुरता मर्यादित नसून, भविष्यात या झाडांचे जबाबदारीने संगोपन करण्याचे आपले सर्वांचे कर्तव्य असल्याचे नमूद केले. प्रत्येक विद्यार्थ्याने एक झाड दत्तक घेऊन त्याची निगा राखावी, हीच खरी पर्यावरणसेवा होईल असे प्रतिपादन केले.
संस्था सचिव शिरीष फाटक यांनी आपल्या मनोगतात या उपक्रमामुळे परिसरात हरितावरण वाढेल, तसेच पर्यावरण रक्षणाचा सकारात्मक संदेश समाजात पोहोचेल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. सीमा कोरे, प्रा. विजय मुंडेकर, प्रा. मयुरेश राणे, प्रा. स्वप्नाली झेपले व प्रा. वसंत तावडे यांनी केले होते. कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी “एक पेड़़ माँ के नाम” ही शपथ घेतली.