रत्नागिरी: गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने कोकणवासीयांची मोठ्या प्रमाणावर धावपळ सुरू झाली आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतून कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची प्रचंड गर्दी ठाणे रेल्वे स्थानकात उसळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
प्रवाशांना तब्बल 24 तास प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे गणेशभक्तांचे मोठे हाल होत आहेत.
ठाणे स्थानकावरून सुटणाऱ्या कोकण कन्या एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस, कोकण विशेष एक्सप्रेस या प्रमुख गाड्यांमध्ये गर्दीचा प्रचंड अतिरेक झाला आहे. जनरल डब्यातून प्रवास करण्यासाठी लोकांना 24 तास आधीच स्थानकावर पोहोचावे लागत असून अनेक कुटुंबे लहान मुलांसह स्थानकात रात्रीभर थांबून आहेत. महिलांनी स्थानकात सोयीसुविधांचा अभाव असल्याची तक्रार केली असून, तब्बल 24 तास बसून राहणे कठीण असल्याचे सांगितले आहे. प्रवाशांचा त्रास लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने जास्तीत जास्त जनरल डबे जोडावेत, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, रस्तेमार्गेही कोकणात जाणाऱ्यांची गर्दी वाढली असून मुंबई-गोवा महामार्गावर माणगावजवळ शनिवारी तब्बल तीन किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहा उपविभागीय पोलीस अधिकारी, 10 पोलीस निरीक्षक, 52 उपनिरीक्षक आणि 405 अंमलदार तैनात असून, अनधिकृत पार्किंग व नियम तोडणाऱ्यांवर पोलिसांकडून करडी नजर ठेवली जात आहे.
गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासीयांना रस्त्यावर खड्डे, महामार्गावरील कोंडी आणि रेल्वे स्थानकांवरील प्रचंड गर्दी अशा तिहेरी संकटांचा सामना करावा लागत आहे. मात्र सर्व अडचणींवर मात करत भाविक ‘गणरायाच्या भेटीला’ निघाले आहेत.
गणेशोत्सवासाठी चाकरमानी निघाले कोकणात : रेल्वेसह मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड गर्दी
