GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी पोलिसांचे ‘मिशन प्रतिसाद’ अभियान: ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य

Gramin Varta
10 Views

रत्नागिरी – रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या कल्पकतेतून जिल्हा पोलिसांनी ‘मिशन प्रतिसाद’ नावाचे अभिनव अभियान सुरू केले आहे. नागरिकांच्या तक्रारींना त्वरित व प्रभावी प्रतिसाद देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून, विशेषतः वृद्ध नागरिकांना मदत करण्यावर यात भर देण्यात आला आहे.
चिपळूण येथे नुकत्याच घडलेल्या निवृत्त शिक्षकांच्या खून प्रकरणानंतर एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर ‘मिशन प्रतिसाद’ अंतर्गत वृद्ध आणि एकटे राहणाऱ्या नागरिकांसाठी एक विशेष कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये बिट अंमलदार आणि पोलीस पाटील हे ४५ वर्षांवरील एकट्या व्यक्तींच्या घरी जाऊन त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहेत, जेणेकरून त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना मदत करणे सोपे होईल.

या अभियानांतर्गत प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘नोडल अधिकारी’ नेमण्यात आले आहेत. हे अधिकारी थेट नागरिकांशी संपर्क साधून त्यांच्या समस्यांचे निराकरण करतात, ज्यामुळे नागरिकांना छोट्या-मोठ्या कामांसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जाण्याची गरज भासणार नाही. या उपक्रमामुळे पोलिसांची कार्यक्षमता वाढेल आणि नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होईल.

या अभियानातील सर्वात अनोखी संकल्पना म्हणजे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या सहीचे शुभेच्छापत्र वृद्ध नागरिकांना त्यांच्या वाढदिवशी बिट अंमलदारांमार्फत दिले जाणार आहे. अशा प्रकारची अभिनव योजना राज्यात प्रथमच रत्नागिरीत राबवली जात आहे. ‘मिशन प्रतिसाद’मुळे पोलिसांचे काम अधिक पारदर्शक होईल आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यास मदत मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून, एकट्या आणि गरजू वृद्ध नागरिकांसाठी हा उपक्रम खऱ्या अर्थाने ‘प्रतिसाद’ देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Total Visitor Counter

2648076
Share This Article