देवरुख पोलिसांकडून संशयिताचा शोध सुरू, पथके रवाना
देवरुख : देवरुखातील सुवर्णकार धनंजय गोपाल केतकर (63, मार्लेश्वर फाटा देवरुख ) यांच्या अंगावरील दागिने लुटून अपहरण केल्याची घटना बुधवारी रात्री घडली होती. 2 कार मधून आलेल्या 10 जणांनी सोन्या चांदीचे दागिने 14 लाखांचे दागिने लुटून फरार झाले होते. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. देवरुख पोलिस या घटनेत सखोल तपासाला सुरुवात करत केतकर यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपीचे रेखाचित्र जारी केले आहे. हे रेखाचित्र पोलिसांनी प्रकाशित केले असून आरोपीच्या शोधासाठी पोलिस पथके तयार केली आहेत.
धनंजय गोपाल केतकर (63, मार्लेश्वर फाटा देवरुख ) हे सुवर्णकार असून बुधवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास मित्राकडील कार्यक्रम आटोपून आपल्या चारचाकी गाडीतून साखरपाहून देवरूखच्या दिशेने येत होते. रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास वांझोळे येथे दोन गाड्यातील 10 जणांनी उतरून त्यांची गाडी अडवली. दरोडेखोरांनी त्यांना गाडीतून बाहेर काढून मारहाण केली. हा मारहाणीत त्यांना जबर दुखापत झाली. हल्लेखोरांनी त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून त्यांना गाडीत कोंबले आणि राजापूरच्या दिशेने गाडी गेली. राजापूर वाटूळ येथे त्यांना सोडून त्या दोन गाड्या पुढे मार्गस्थ झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी तपासाला गती दिली. आरोपी अनोळखी असल्याने त्यांची ओळख पटवणे पोलिसांसमोर आव्हान आहे. मात्र पोलिसांनी केतकर यांच्याशी संवाद साधून आरोपीच्या वर्णनानुसार स्केच तयार करून घेतले. त्यानुसार संशयिताचे स्केच तयार करून प्रसिद्धीसाठी दिले आहे. त्यामुळे आता आरोपीला शोधणे पोलिसांना सोयीस्कर होणार आहे. आरोपीला लवकरच अटक करू असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
संशयित व्यक्त कोणाला दिसून आल्यास देवरुख पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.