GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी नगर परिषदेच्या अभियंत्यावर गुन्हा दाखल; उपनगराध्यक्षांना शिवीगाळ केल्याचा आरोप

Gramin Varta
234 Views

रत्नागिरी: रत्नागिरी नगर परिषदेमध्ये गाजत असलेल्या शौचालय घोटाळ्याच्या वादाने आता कायदेशीर वळण घेतले असून पालिकेचे बांधकाम अभियंता यतिराज जाधव यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे नगर परिषद वर्तुळात आणि राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २२ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर हे अभियंता यतिराज जाधव यांच्याकडे गेले होते. यावेळी तिवरेकर यांनी शौचालय घोटाळ्याबाबत जाब विचारण्यास सुरुवात केली असता दोन्ही बाजूंनी जोरदार शाब्दिक चकमक उडाली. या वादाचे पर्यावसान राड्यात झाले असून अभियंता जाधव यांनी आपल्याला अश्लील शिवीगाळ केली आणि मारण्यासाठी अंगावर धावून आले, असा खळबळजनक आरोप तिवरेकर यांनी आपल्या तक्रार अर्जात केला आहे. इतकेच नव्हे तर जाधव यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

या गंभीर प्रकारानंतर समीर तिवरेकर यांनी थेट रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गाठून आपली तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत बांधकाम अभियंता यतिराज जाधव यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३५२, ३५१(२) आणि १३१ नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. शौचालय घोटाळ्यावरून आधीच पालिकेतील वातावरण तापलेले असताना, आता लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यातील या थेट संघर्षामुळे शहरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

Total Visitor Counter

3376188
Share This Article