GRAMIN SEARCH BANNER

रेवदंडा शाळेत अघोरी कृत्याने खळबळ; षडयंत्राचा संशय

Gramin Varta
3 Views

रायगड: रेवदंडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात भीती, संताप आणि संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमागे केवळ अंधश्रद्धा नसून मोठे षडयंत्र दडले असल्याचा संशय स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

तालुक्यातील मारुती आळी परिसरातील शाळेत अज्ञात व्यक्तींनी रात्रीच्या सुमारास घुसखोरी करत पाठीमागील दरवाजा तोडून वर्गात विचित्र साहित्य पसरवले. वर्गात भाकरीचे पीठ, लिंबू, हळद, गुलाल, लाल दोरे आणि तुटलेल्या बांगड्या असे करणीसदृश्य साहित्य आढळून आले. याशिवाय दरवाजा आणि स्वच्छतागृह परिसरात रक्तासारखे डाग आढळल्याने या घटनेने अधिकच गूढ आणि भीषण स्वरूप धारण केले आहे.

घटनेची माहिती मिळताच मुख्याध्यापकांनी तात्काळ पोलिसांना कळवले. रेवदंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकारामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, स्थानिक नागरिकांनी या घटनेकडे गंभीरतेने पाहण्यास सुरुवात केली आहे.

काही दिवसांपूर्वी परिसरातील एका मराठी शाळेचे अस्तित्व संपुष्टात आल्याच्या पार्श्वभूमीवर, ही शाळा बंद करून त्या जागेवर व्यावसायिक प्रकल्प उभारण्याचा डाव असू शकतो, असा आरोप करण्यात येत आहे.

शाळेत नुकत्याच झालेल्या पेव्हर ब्लॉक कामावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून, माहिती अधिकारातून संबंधित कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहे. संभाव्य भ्रष्टाचार उघड होण्याच्या भीतीने हा प्रकार घडवण्यात आला असावा, अशीही चर्चा रंगत आहे.

रेवदंडा परिसरात सध्या लिंबू, हळद, गुलाल टाकण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, अंधश्रद्धेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका होत आहे. स्थानिक राजकीय वाद, बांधकाम लॉबी आणि व्यावसायिक स्पर्धा यामागे असू शकतात, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

निवडणुका संपल्यानंतरही असे प्रकार सुरू राहिल्याने या मागील खरा हेतू काय, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून सत्य समोर आणण्याची जोरदार मागणी केली आहे.

Total Visitor Counter

3203984
Share This Article