रत्नागिरी : वीजग्राहकांना कार्यालयात फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी महावितरणने अनेक सेवा थेट ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. घरबसल्या वीजजोडणीवरील नाव बदलणे तसेच वीजभार वाढ–कपात करणे आता काही दिवसांत शक्य होत आहे. रत्नागिरी–सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत १,१९८ ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.
घर किंवा दुकान खरेदी-विक्री, वारसा हक्क, नावातील दुरुस्ती अशा कारणांसाठी वीजबिलावरील नाव बदलावे लागते. यासाठी महावितरणचे मोबाइल अॅप किंवा www.mahadiscom.in या संकेतस्थळावर लॉग-इन करून ऑनलाइन अर्ज करता येतो. अर्ज करताना कारण निवडून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात. शुल्क ऑनलाइन भरल्यानंतर साधारण तीन ते सात दिवसांत नाव बदलाची प्रक्रिया पूर्ण होते. याशिवाय घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक आदी लघुदाब ग्राहकांसाठी १५७ केडब्ल्यूपर्यंत वीजभार वाढ किंवा कमी करण्याचे अर्जही आता ऑनलाइन आणि स्वयंचलित पद्धतीने मंजूर होत आहेत. आधीच्या जोडणीतील वीजभार बदलायचा असल्यास ही सुविधा वापरता येते.
वीजभार वाढवताना सिंगल फेजऐवजी थ्री फेजची गरज असल्यास नवीन मीटर बसवण्यात येतो. अशा ठिकाणी संबंधित एजन्सीला आपोआप आदेश दिला जातो. नवीन मीटर आवश्यक असलेल्या प्रकरणांतही बहुतांश वेळा ४८ तासांत वीजभार वाढीची प्रक्रिया पूर्ण होत असल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळत आहे.
महावितरणच्या या ऑनलाइन सुविधांमुळे वेळ, श्रम आणि खर्च वाचत असून सर्वसामान्य वीजग्राहकांसाठी कामकाज अधिक सोपे झाले आहे.
महावितरणची ग्राहकांसाठी घरबसल्या सेवा; ॲपद्वारे 1200 ग्राहकांकडून नावात बदल






