GRAMIN SEARCH BANNER

दापोलीत वादळी पावसाचा हाहाकार; सोंडेघरमध्ये झाड कोसळून घराचे मोठे नुकसान

Gramin Varta
444 Views

संगलट (खेड):  दापोली तालुक्यातील सोंडेघर परिसरात आज शनिवारी दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने मोठे थैमान घातले. या नैसर्गिक आपत्तीत सोंडेघर येथील स्थानिक रहिवासी मुकद्दर नांदगावकर यांच्या घरावर नारळाचे झाड कोसळल्याने घराचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

दुपारच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन सुटलेल्या प्रचंड वेगाच्या वाऱ्यामुळे नांदगावकर यांच्या घराशेजारील नारळाचे माड मुळासकट उपटून थेट घराच्या छतावर कोसळले. या तडाख्यामुळे घराचे छप्पर आणि भिंती जमीनदोस्त झाल्या असून घरातील सामानाचीही मोठ्या प्रमाणावर नासधूस झाली आहे. ज्यावेळी हे झाड पडले, त्यावेळी घरातील सदस्य सुरक्षित ठिकाणी असल्याने मोठा अनर्थ टळला. याव्यतिरिक्त कादिर चिपळूणकर यांच्यासह परिसरातील इतरही अनेक घरांचे या वादळामुळे नुकसान झाले आहे.
या वादळामुळे सोंडेघर परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी वीज वाहिन्या तुटून पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती आणि चिखल साचल्याने दुचाकी घसरून अपघातांच्या घटनाही घडत आहेत. प्रशासनाने या भागातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून बाधित कुटुंबांना योग्य आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Total Visitor Counter

3388102
Share This Article