GRAMIN SEARCH BANNER

राजापुर : सौंदळ भालेकरवाडीत कौटुंबिक वादातून सख्ख्या पुतण्यावर कुऱ्हाडीने हल्ला; काकाविरुद्ध गुन्हा दाखल

Gramin Varta
139 Views

राजापूर: तालुक्यातील सौंदळ भालेकरवाडी येथे कौटुंबिक वादाचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात झाले असून, सख्ख्या काकाने आपल्या पुतण्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात पुतण्या गंभीर जखमी झाला असून, राजापूर पोलिसांनी संशयित आरोपी दशरथ गोपाळ चव्हाण याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी तुकाराम गोपाळ चव्हाण हे आपल्या पत्नी आणि मुलासह घरात असताना त्यांच्यात घरगुती कारणावरून वाद सुरू होता. यावेळी त्यांचा भाऊ आणि संशयित आरोपी दशरथ चव्हाण तिथे आला व त्याने कौटुंबिक जुन्या वादाचा संदर्भ देत वादावादी सुरू केली. फिर्यादीचा मुलगा नरेंद्र याने या वादात हस्तक्षेप करत विचारणा केली असता, संशयित आरोपीने संतापून आपल्या हातातील बॅटरी नरेंद्रच्या डोक्यावर मारली आणि तो शिवीगाळ करत आपल्या घरी निघून गेला.

यानंतर, ‘तू शिवीगाळ का करतोस?’ असा जाब विचारण्यासाठी नरेंद्र संशयित आरोपी दशरथ याच्या घराच्या अंगणात गेला. मात्र, संतापलेल्या दशरथने तिथेच पडलेली लाकडी दांड्याची लोखंडी कुऱ्हाड उचलली आणि नरेंद्रच्या डोक्यावर प्रहार केला. या गंभीर हल्ल्यात ३२ वर्षीय नरेंद्र चव्हाण याला मोठी दुखापत झाली आहे. याप्रकरणी तुकाराम चव्हाण यांनी ५ एप्रिल रोजी पहाटे राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत आरोपी दशरथ चव्हाण याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८ (१), ३५२, ३५१(१) आणि ३५१(२) नुसार गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3258753
Share This Article