रोटरी स्कूलच्या तीन विद्यार्थ्यांना ‘बालवैज्ञानिक’ सन्मान; तिघांनीही पटकावले रौप्य पदक

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

खेड: मुंबई विज्ञान शिक्षक असोसिएशन, मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेच्या तृतीय पातळीचा निकाल जाहीर झाला असून खेड येथील रोटरी स्कूलच्या इयत्ता सहावीतील कु.पूर्वी सूर्यवंशी, कु. अथर्व हलगवार आणि कु. अर्णव घुंबरे या तिन्ही विद्या

र्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत रौप्य पदक पटकावले आहे. तसेच या तिघांनाही ‘बालवैज्ञानिक’ हा मानाचा किताब मिळाला आहे.

या यशाचे विशेष म्हणजे, कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतून अंतिम मुलाखतीसाठी निवड झालेल्या 11 विद्यार्थ्यांपैकी तब्बल 3 विद्यार्थी हे रोटरी स्कूलचेच होते. या तिन्ही विद्यार्थ्यांनी अंतिम टप्प्यातही उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदक मिळवून शाळेचा नावलौकिक उंचावला आहे.

विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी विविध सामाजिक व पर्यावरणपूरक विषयांवर कृतिसंशोधन सादर केले. कु. पूर्वी सूर्यवंशी हिने ‘रासायनिक खतांचा पर्यावरण व मानवी शरीरावरील परिणाम’ या विषयावर सखोल अभ्यास करत जमिनीचे आरोग्य, जैवविविधता, पिकांची वाढ आणि सूक्ष्म हवामान यावर होणाऱ्या परिणामांचा ऊहापोह केला असून शाश्वत शेतीसाठी पर्यायही सुचविले आहेत. कु. अर्णव घुंबरे याने ‘मानव-बिबट्या संघर्ष’ या विषयावर संशोधन करत कचरा व्यवस्थापनातील त्रुटी, जंगलतोड आणि जागरूकतेच्या अभावामुळे वाढणाऱ्या संघर्षाचे विश्लेषण केले असून योग्य उपाययोजना राबवल्यास हा संघर्ष कमी होऊ शकतो, असे निष्कर्ष मांडले आहेत. तर कु. अथर्व हलगवार याने ‘खाणकामाचा विषारी वारसा’ या विषयावर संशोधन करत खाणीतील कामगारांच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचवल्या आहेत.

डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा ही चार टप्प्यांत घेतली जाते. यामध्ये लेखी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा, कृतिसंशोधन आणि मुलाखत या टप्प्यांचा समावेश असतो. अंतिम टप्प्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या या विद्यार्थ्यांचा मुंबईतील यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा येथे पदक, रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

या सर्व विद्यार्थ्यांना सौ. दिपाली दरेकर, सौ. तेजश्री क्षीरसागर, सौ. तनुजा चव्हाण, श्री. राहूल चव्हाण, श्री. प्रसाद सावंत, सौ. वैष्णवी धुमाळ, प्रयोगशाळा सहाय्यक प्राजक्ता गावडे तसेच ग्रंथपाल सौ. सिद्धी दामले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन मा. बिपीनदादा पाटणे, मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, सर्व पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *