सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घुमणार डरकाळी! ‘रायबा’, ‘सरदार’नंतर आता ‘राणोजी’ची एन्ट्री; वाघांची संख्या दहावर

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

वारणावती : रायबा, सरदारनंतर आता राणोजी या नव्या वाघाची सह्याद्रीत एंट्री झाली. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्यात या तीन वाघांची नोंद झाली. ‌’रायबा‌’ व ‌’सरदार‌’ वाघांसोबत आता ‌’राणोजी‌’ या नव्या नर वाघाची कॅमेरा ट्रॅपमध्ये नोंद झाली.

त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व राधानगरी अभयारण्य मिळून सात नर व तीन मादी वाघिणी अशी संख्या दहावर पोहोचली.

वन विभागाने या तिन्ही वाघांच्या क्षेत्राचा अभ्यास सुरू केला आहे. राधानगरी अभयारण्य, सावंतवाडी-दोडामार्ग व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जंगल पट्टा वाघांसाठी अत्यंत अनुकूल आहे. चांदोली अभयारण्यात वाघ व वाघिणींना स्थलांतरित करून आणले असले, तरी राधानगरी अभयारण्यात आढळलेले हे तीन नर वाघ मात्र स्थलांतरित नाहीत. ते नैसर्गिकरीत्या येथे दाखल झाले आहेत. त्यामुळे राधानगरी अभयारण्यात एक-दोन वाघिणी स्थलांतरित करून सोडल्यास वाघ संवर्धनासह पर्यटनालाही मोठी चालना मिळू शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

या नव्या राणोजी वाघाविषयी क्षेत्र संचालक तुषार चव्हाण म्हणाले, काही महिन्यांपासून राधानगरी परिसरात एका नव्या नर वाघाचे अस्तित्व अधोरेखित झाले होते. ऑल इंडिया टायगर इस्टिमेशनमध्येही या वाघाची नोंद झाली आहे. साधारण तीन ते चार वर्षे वयाचा हा वाघ सुदृढ आहे. यापूर्वी कोणत्याही डेटाबेसमध्ये त्याची नोंद नव्हती. त्यामुळे या वाघाला एसटीआरटी-10 ‌’राणोजी‌’ असे नाव दिले. सह्याद्रीतील नव्या राणोजीच्या रूपाने सह्याद्रीत सात नर व तीन मादी वाघिणी असे दहा वाघ झाले आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *