GRAMIN SEARCH BANNER

‘प्रतीक्षा’च्या विशेष मुलांसोबत प्रजासत्ताक दिन साजरा; आमदार किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली जैनु लांजेकर यांचा मदतीचा हात

Gramin Varta
199 Views

दिव्यांग मुले समाजाचा अविभाज्य घटक आहेत; त्यांना सहानुभूतीची नाही, तर समान संधी आणि आत्मविश्वासाची गरज -जैनु लांजेकर

लांजा: प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विलवडे येथील ‘प्रतीक्षा विशेष शाळा’ येथे एका आगळ्यावेगळ्या आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिव्यांग मुले ही समाजाचा अत्यंत महत्त्वाचा आणि अविभाज्य घटक असून, त्यांना केवळ सहानुभूती दाखवून चालणार नाही, तर समाजात सन्मानाने जगण्यासाठी समान संधी आणि आत्मविश्वासाचे बळ देणे ही काळाची गरज आहे, असे ठाम मत प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक जैनु लांजेकर यांनी यावेळी व्यक्त केले.

लांजा राजापूरचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी जैनु लांजेकर यांनी आमदार सामंत यांचे विश्वासू सहकारी म्हणून पुढाकार घेत शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंची भेट दिली आणि मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले. केवळ उत्सव साजरा न करता, या विशेष मुलांच्या गरजा समजून घेत त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला. भविष्यातही या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शाळेच्या प्रगतीसाठी आपण सातत्याने मदतीचा ओघ सुरू ठेवू, असा शब्दही लांजेकर यांनी यावेळी दिला.

या कौतुकास्पद उपक्रमाबद्दल शाळेचे व्यवस्थापक फादर अगस्ती आणि मुख्याध्यापिका सिस्टर धन्या यांचे आभार मानण्यात आले. या विशेष कार्यक्रमाला सहकारी मोहिद याहू आणि असीम पाटणकर हे देखील सोबत होते. समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी दाखवलेल्या या दातृत्वामुळे आणि आमदार किरण सामंत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमामुळे विलवडे परिसरातून या संवेदनशील कार्याचे मोठ्या प्रमाणावर कौतुक केले जात आहे.

Total Visitor Counter

3379518
Share This Article