राजापूर/राजू सागवेकर :विविध वैशिष्टपूर्ण उपक्रम राबविण्यात अग्रेसर आणि अनेक पुरस्कारांनी गौरविलेले जैतापुरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, जैतापुर यांच्या वतीने येत्या नोव्हेंबर अखेरीला भव्य आमदार भैय्याशेठ सामंत सन्मान चषक जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष व माजी सरपंच गिरीश करगुटकर यांनी दिली आहे.
मंडळाच्या वतीने दरवर्षी सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात अनेक उपक्रम राबविले जातात. गेल्या 26 वर्षांपासून मंडळाने तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर विविध बक्षिसे मिळवून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. यावर्षीही मंडळाने जिल्हा स्तरावर दोन पुरस्कार पटकावले आहेत.
गतवर्षी आयोजित करण्यात आलेल्या आमदार सन्मान चषक जिल्हा कॅरम स्पर्धेला जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्या स्पर्धेचे नियोजन आणि आयोजन इतके भव्य होते की जिल्हा कॅरम असोसिएशनचे पदाधिकारीही अचंबित झाले होते.
याच परंपरेला पुढे नेत भव्य जलतरण स्पर्धा नोव्हेंबर अखेरीला जैतापुर खाडीमध्ये घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील आणि राज्यातील नामवंत जलतरणपटू सहभागी होणार असून, या माध्यमातून जिल्हा क्रीडा क्षेत्रात जैतापुरचे नाव पुन्हा एकदा उजळणार आहे.
या स्पर्धेच्या आयोजनासाठी तुळसुंदे, साखरीनाटे, कोकरी, जुवे, बूरम्बेवाडी आणि घोडपोई येथील दर्यावर्दी बांधव तसेच होडी मालक व चालक यांचे सहकार्य घेतले जाणार आहे.
पूर्वी आमदार गणपतदादा कदम यांच्या गौरवप्रीत्यर्थ झालेल्या जलतरण स्पर्धेचे यशस्वी आयोजन माजी सरपंच गिरीश करगुटकर यांनी केले होते. त्या यशस्वी परंपरेला पुढे नेत यावेळीही मंडळाने तयारी सुरु केली असून, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या स्पर्धेकडे लागले आहे.