देवरुख : शहरातील श्री हनुमान प्रासादिक बालमित्र समाज खालची आळी मंडळाची पारंपरिक शांततेची दिंडी रविवारी रात्री ग्रामदेवता सोळजाई मातेच्या मंदिराकडे मोठ्या जल्लोषात नेण्यात आली. नवरात्र उत्सवातील सातव्या माळेला काढल्या जाणाऱ्या या दिंडीची यंदाही उत्साहात पुनरावृत्ती झाली.
या दिंडीचे मुख्य आकर्षण म्हणजे पौराणिक जिवंत देखावे. यावर्षी अशोक वनातील हनुमंताची सीतामाईंसोबतची भेट हा प्रसंग प्रभावीपणे साकारण्यात आला. सीता, हनुमान आणि दोन राक्षसींच्या भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली. तब्बल ११ जणांची वानरसेना माकडचाळे, झाडांवर उड्या, छप्परांवर चढणे अशा खऱ्या वानरांच्या हालचालींसारख्या करामतींनी दिंडी मार्गावरील नागरिकांना मंत्रमुग्ध केले.
ताशेवाजंत्री, मृदुंग व भजनाच्या तालावर महिला-पुरुषांचा नाच रंगला. रिक्षा स्टँड, एसटी स्टँड, माणिक चौक, दत्त मंदिर मार्गे सोळजाई मंदिरापर्यंत दिंडी नेण्यात आली. मंदिराजवळ मानकरी व गुरव यांनी वाजंत्रीसह स्वागत करून आरती घेतली. मानाचे श्रीफळ अदलाबदल करून मंदिर प्रदक्षिणा देत देवीसमोर शांततेचे गाऱ्हाणे घालून दिंडीची सांगता करण्यात आली.
मंडळाध्यक्ष श्रीकांत साळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व पुरुष सभासदांनी ही परंपरा जपत दिंडी पार पाडली. गेल्या चार वर्षांपासून तरुण कार्यकर्ते देखाव्यांमध्ये वेगळेपण आणत असल्याने दिंडीला नवा रंग मिळत आहे.
कलाकारांची नावे
हनुमान – ओंकार पवार, प्रतीक वनकर
राक्षसी – दिलीप वनकर, महेश पवार
सीता – सुयशा मुळ्ये
वानरसेना – दिलीप करंडे, गौरेश घडशी, तृशार घडशी, श्रवण नलावडे, सार्थक नलावडे, वरद पावसकर, स्वरूप नलावडे, शिवम नलावडे, अर्णव सनगले, रुद्र वनकर, पवन करंडे.
देवरुख : हनुमान प्रासादिक बालमित्र समाजाची शांततेची दिंडी उत्साहात
