GRAMIN SEARCH BANNER

खेडमध्ये घर फोडून 2.30 लाखांचे दागिने लंपास

Gramin Varta
4 Views

खेड : तालुक्यातील कुरवळ गावठाण येथे घर फोडून चोरट्यांनी सुमारे २.३० लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून गेल्याची घटना उघडकीस आली. ही घरफोडी १ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७ ते २ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ६.३० च्या दरम्यान घडली असून, अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा फायदा घेत लाखोंचा ऐवज लंपास केला आहे.

याप्रकरणी हरिश्चंद्र चापू उतेकर (वय ५०, व्यवसाय-शेती, रा. कुरवळ गावठाण, ता. खेड) यांनी खेड पोलिसांत फिर्याद दिली आहे. उतेकर यांच्या तक्रारीनुसार, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या राहत्या घराच्या पाठीमागील दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर, पोटमाळ्यावर असलेल्या पत्र्याच्या पेटारातून सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले.

चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये १ लाख १९ हजार ३७२ रुपये किमतीचा १८ ग्रॅम ९४० मिली वजनाचा एक सोन्याचा हार, ९४ हजार १२६ रुपये किमतीची सोन्याची वाटी (३ ग्रॅम ४०० मिली) आणि १३ ग्रॅम ९४० मिली वजनाची सोन्याची एक सर असलेले मंगळसूत्र, ८ हजार ६३२ रुपये किमतीची १ ग्रॅम ३० मिली वजनाची सोन्याची बाळी आणि ८ हजार रुपये किमतीची ११५ ग्रॅम वजनाची चांदीची साखळी यांचा समावेश आहे. एकूण २ लाख ३० हजार १३० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

खेड पोलिसांनी अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Total Visitor Counter

2648354
Share This Article