मुंबई : राज्यात गोवंश हत्याबंदीचा कायदा आहे. मात्र, या कायद्याच्या आडून तथाकथित गोरक्ष शेतकऱ्यांना लुटत आहेत. शेतकऱ्यांना बैल बाजारात विकणे मुश्कील झाले असून या गोरक्षकांना पायबंद घाला, अशी मागणी काँग्रेसचे नाना पटोले यांनी विधानसभेत केली.
गोंदिया जिल्ह्यात शेतकरी शेतीसाठी बैल घेऊन जात असताना पोलिसांनी पकडले. बैल जप्त केले आणि गोरक्षकांच्या स्वाधीन करून त्यांच्या संस्थेत पाठवले. मी जिल्हाधिकाऱ्यास फोन केला असता, त्यांनी ठाणेदाराला बैल सोडण्यास सांगितले. परंतु, या गोरक्षकांनी बैल देण्यास नकार दिला. त्यांनी ते परस्पर विकून टाकले. हे तथाकथित गोरक्षक शेतकऱ्यांना लुटत आहेत. यावर सरकारने उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशी मागणी पटोले यांनी केली.
शेतकऱ्यांवर अन्याय झाला, तिथे मी खासदारकी सोडली. सत्तेतील लोक जर शेतकऱ्यांचा छळत असतील तर कदापि सहन केले जाणार नाही. काल शेतीप्रश्नावरील चर्चेदरम्यान सभागृहात मंत्री नव्हते. शेतकऱ्यांविषयी या सरकारची काय मानसिकता आहे, हे जनतेने पाहिले आहे. ज्या महाराष्ट्राने देशाला दिशा देण्याचे काम केले, त्या राज्यात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या भूषणावह नाहीत. शेतीची परिस्थिती बिघडवण्याचे काम केंद्र व राज्यातील भाजप सरकारांनी केले असून शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी सरसकट शेतकरी कर्जमाफी करावी, अशी मागणी पटोले यांनी केली.
शेतकऱ्यांना लुटणाऱ्या गोरक्षकांना पायबंद घाला, काँग्रेसच्या नाना पटोले यांची विधानसभेत मागणी

Leave a Comment