राजापूर : तालुक्यातील सोलगाव परिसरात रस्त्यावर बसविण्यात आलेल्या स्ट्रीट लाईट तसेच त्याच्या बॅटऱ्या चोरी करणाऱ्या एका भंगार व्यवसायिकाला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. याप्रकरणी गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत कारवाई सुरू होती..
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोलगाव परिसरात शासकीय निधीतून रस्त्यावर बसविण्यात आलेल्या सोलर स्ट्रीट लाईट तसेच स्ट्रीट लाईटच्या बॅटऱ्या चोरी होत असल्याचे प्रकार सातत्याने घडत होते. त्यामुळे ग्रामस्थांनी स्ट्रीट लाईट व बॅटऱ्या चोरणाऱ्याचा माग काढण्यासाठी पाळत ठेवली होती. अशातच गुरुवारी दिवसाढवळ्या सोलर स्ट्रीट लाईटची बॅटरी काढून नेताना एक भंगार व्यवसायीक ग्रामस्थांच्या निदर्शनास आला. ग्रामस्थांनी तत्काळ याबाबत राजापूर पोलिसांशी संपर्क साधून बॅटरी चोरणाऱ्या भंगार व्यवसायिकाला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
दरम्यान तालुक्यात बहुतांश सर्व ग्रामपंचायतींनी शासकीय निधीतून गावा गावांमध्ये सोलर स्ट्रीट लाईट बसविल्या आहेत. मात्र या सोलर स्टीट लाईट तसेच जुन्या स्ट्रीट लाईटच्या बॅटऱ्या चौरी होत असल्याने शासनाचा या स्ट्रीट लाईटवर झालेला खर्च वाया जात आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्ट्रीट लाईट व बॅटऱ्या चोरीचे प्रकार घडले आहेत. मात्र सोलगाव ग्रामस्थांनी जागरूकतेने स्ट्रीट लाईट व बॅटऱ्या चोरणाऱ्याला पकडून दिल्याने या प्रकारांना आता आळा बसण्याची शक्यता आहे.
राजापूर : सोलगाव येथे स्ट्रीट लाईट, बॅटऱ्या चोरणाऱ्याला ग्रामस्थांनी पकडले
