राजापूर: राजापूर तालुक्यातील कणेरी, टोकळवाडी येथील रिक्षाचालक निलेश काशिनाथ शिरवडकर (वय ४९) यांचा डोंगर धार येथे अकस्मात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी दुपारी घडली. वैशाली गावीलकर यांना डोंगर दत्तवाडी येथे सोडून परत येत असताना, रस्त्याच्या कडेला ते बेशुद्ध अवस्थेत आढळून आले.
मिळालेल्या माहितीनुसार, निलेश शिरवडकर हे आपली रिक्षा (क्र. एम.एच.०८ बी.सी ०८५३) घेऊन भाडे सोडण्यासाठी डोंगर दत्तवाडी येथे गेले होते. भाडे सोडून दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास ते डोंगर धार येथून परत येत असताना, रस्त्याच्या बाजूला बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसले. स्थानिक नागरिक आणि सुनील कोठारकर यांनी तातडीने त्यांना सुनील कोठारकर यांच्याच रिक्षातून राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
ही घटना ३ जुलै २०२५ रोजी घडली असून, या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू क्रमांक ३५/२०२५, बी.एन.एस.एस १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने कणेरी आणि टोकळवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.