मुंबई : राज्यात मराठवाड्यासह इतर भागांमध्ये झालेली अतिवृष्टी आणि महापूरामुळे उमेदवारांना अर्ज भरण्यात तांत्रिक अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (टीईटी) अर्ज दाखल करण्यास राज्य परीक्षा परिषदेने मुदतवाढ दिली आहे.
नव्या वेळापत्रकानुसार उमेदवारांना ९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. या मुदतवाढीमुळे टीईटी परीक्षा देण्यासाठी इच्छूक अउमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
राज्यातील सरकारी शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी अत्यावश्यक असलेली शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतली जाते. या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणारे उमेदवारच भरतीसाठी पात्र ठरतात. यंदा ही परीक्षा २३ नोव्हेंबर रोजी होणार असून त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया १५ सप्टेंबरपासून सुरू झाली. या अर्जनोंदणी प्रक्रियेला ३ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. या पूरस्थितीमुळे यामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड नुकसान झाले. वाहतूक व्यवस्था व इतर तांत्रिक समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे ‘महा-टीईटी’ परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यात उमेदवारांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी येत होत्या.
या पार्श्वभूमीवर युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन आदी संघटनांनी टीईटी या परीक्षेच्या अर्ज नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी राज्य परीक्षा परिषदेकडे केली होती. अर्ज भरण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन राज्य परीक्षा परिषदेने शुक्रवारी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता ९ ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यास ९ ऑक्टोबर रोजी रात्री ११.५९ पर्यंत अर्ज व शुल्क भरता येईल, असे राज्य परीक्षा परिषदेकडून जाहीर करण्यात आले आहे. तसेच यापुढे कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे राज्य परीक्षा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
परीक्षेचे वेळापत्रक
यापूर्वी झालेल्या परीक्षेत ३ लाख ५३ हजार ९५२ शिक्षकांनी नोंदणी करून परीक्षा दिली. मात्र त्यापैकी फक्त ३.३८ टक्के म्हणजेच ११ हजार १६८ शिक्षक परीक्षा उत्तीर्ण झाले होते. दरम्यान, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने टीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले असून २३ नोव्हेंबर रोजी ही परीक्षा होणार आहे. १५ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या काळात शिक्षक ऑनलाइन अर्ज आणि परीक्षा शुल्क भरू शकतील. त्यानंतर शिक्षकांना १० ते २३ नोव्हेंबर या काळात आपले प्रवेशपत्र ऑनलाइन उपलब्ध होईल. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० ते १ या वेळेत पहिला पेपर होईल, तर दुपारी २.३० ते ५ या वेळेत पेपर क्रमांक २ होणार आहे.
टीईटी अर्ज भरण्यास मुदतवाढ; ९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करता येणार
