राजापूर : “रील्स, स्टेट्सने नाही तर ज्ञान, मेहनत, कष्टाने स्वतःला घडवा !” अशा शब्दांत करिअर मार्गदर्शक गणेश शिंदे यांनी विद्यार्थ्यांना भावनिक आवाहन करून त्यांच्या मनात आशा आणि जिद्द निर्माण केली.
ते राजापूर येथे आयोजित स्पर्धा परीक्षा वाचनालयाच्या उद्घाटन आणि करिअर मार्गदर्शन परिषदेत बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक आणि शिवसेना उपनेते नीलेश सांबरे, आमदार किरण सामंत, माजी आमदार राजन साळवी, माजी विधान परिषद सदस्य अॅड. हुस्नबानू खलिफे, शिवसेना तालुकाप्रमुख दीपक नागले, प्रकाश मांडवकर, अॅड. शशिकांत सुतार, माजी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात झालेल्या या समारंभात सभागृहात विद्यार्थ्यांनी प्रचंड उत्साहात सहभाग घेतला.
गणेश शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने बाळगण्याचे, दररोज अभ्यास करण्याचे आणि जीवनात सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन केले. गरिबीत जन्म घेणे चूक नाही, पण गरिबीत मरणे चूक आहे, असे म्हणत त्यांनी कष्टाच्या महत्त्वावर भर दिला. पालक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
नीलेश सांबरे यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, कोकणात येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध करण्यापूर्वी त्याचा अभ्यास झाला पाहिजे. केवळ विरोधासाठी विरोध न करता वास्तव समजून भूमिका घ्यावी, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.
कार्यक्रमात राजन साळवी आणि हुस्नबानू खलिफे यांनीही आपले विचार मांडून सांबरे यांच्या कार्याचा गौरव केला.
करिअर मार्गदर्शन वाचनालयाचे राजापूरमध्ये उद्घाटन
